Breaking News

जिल्ह्यातील 1131 गावांमध्ये ऑनलाइन सात-बारा


सोलापूर, दि. 02, मे - अनेक अडथळे व अडचणी दूर करीत अखेर जिल्ह्यातील 1131 गावांमध्ये 1 मे पासून ऑनलाइन सात-बारा उपलब्ध होणार आहे. ऑगस्ट 2014 पासून हस्तलिखित उतारा देणे बंद करून संगणकीय उतारे देण्याचे सुरू करण्यात आले असले तरी अनेक अडचणींमुळे नागरिकही त्रासले होते. अखेर साडेतीन वर्षाच्या अथक प्रयत्नांनंतर जिल्ह्यातील 1131 गावांमध्ये दोषमुक्त सात-बारा उतारा उपलब्ध होणार आहे.

राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात सात-बारा उतारे ऑनलाइन करणे, ई फेरफार, जुन्या अभिलेखांचे स्कॅनिंग ही कामे हाती घेण्यात आली. यातील पहिला टप्पा पूर्ण होण्यासाठी जवळपास 5 वर्षांचा कालावधी लागला. खर्‍या अर्थाने 2014 पासून ऑनलाइनची यंत्रणा कामास लागली. सर्व सात-बारा उतारे फिडिंग केल्यानंतर उतार्‍यांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी प्रत्येक गावांमध्ये चावडीवाचन करण्यात आले. मे 2016 पासून उतारे दुरुस्ती मोहिमेत रि-इडिटद्वारे 11 लाख 68 हजार 799 सर्व्हे क्रमांकांपैकी 11 लाख 40 हजार 841 उतारे दुरुस्ती करण्यात आली. यानंतर संगणकीय सात-बारा व हस्तलिखित सात-बारा उतार्‍यांची जुळवणी करण्यात आली.