Breaking News

अनुदानासाठी सरकारचे कदापि पाय धरणार नाही : सपकाळ

नेवासा शहर प्रतिनिधी - चार- चार राष्ट्रपती सन्मान करतात.गेली ४७ वर्षे मी अनाथांना निवारा देण्याचे काम करते. माझे काम खरे की खोटे हे सरकारला कळत नाही का, असा सवाल उपस्थित करत सरकार मात्र माझ्या संस्थेला अनुदान देण्यात उदासिनता दाखवत आहे. मी सरकारची मनधरणी करावी, त्यांच्या व्यासपीठावर जाऊन भाषण द्यावे, अनुदानासाठी त्यांचे पाय धरावे ही जर अपेक्षा असेल तर हे कदापि होणार नाही, असा खणखणीत इशारा अनाथांची माय़ असलेल्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांनी दिला. 

शहरात एका खाजगी कार्यक्रमासाठी आज {दि. १२} आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. स्वतःवर ओढवलेल्या कठीण प्रसंगामधून सावरत जगलेल्या खडतर आयुष्याची कहाणी सांगतानाच त्यामधूनच समाजातील अनाथांचा आधार होण्याची इच्छा निर्माण झाल्याने आजचे एवढे मोठे समाजसेवेचे काम उभे केल्याचे त्या म्हणाल्या. ज्यावेळी देशाचा राष्ट्रपती मी चौदाशे अनाथ मुलांची माय असल्याचे जाहीरपणे सांगतात, विविध प्रकारचे साडेसातशे पुरस्काराने मला गौरवले जाते. परंतू हे सरकारला खरेच कळत नाही. काही दिवसांपूर्वी माझ्या संस्थेला मान्यता देताना समाजकल्याण विभागाने माझ्याकडून लिहून घेतले, मी सरकारकडे ग्रॅंड (अनुदान) मागणार नाही. तर मी पण लिहून दिले, जा मी नाही मागणार तुम्हाला अनुदान. माझ्याबरोबर माझा समाज आहे. मी जे मागायचे ते समाजाला मागेल. पण सरकारकडे जाणार नाही. समाजात आज एखादी दुर्देवी घटना घडली तर मंत्री मात्र मोठे सरंक्षण घेऊन तेथे जातो. परंतू पत्रकार व पोलिस मात्र जीवाची बाजी लावत समाजासाठी तेथे झगडत असतो. ती ही एक प्रकारची समाजसेवाच आहे.