Breaking News

पेरणीयोग्य पावसाशिवाय पेरण्या करू नयेत, राज्य सरकारचे शेतकऱ्यांना आवाहन


मुंबई : मान्सूनचे केरळात आगमन झाले असले तरी अद्याप तो महाराष्ट्रात आलेला नाही. त्याचे महाराष्ट्रात आगमन झाल्यानंतरसुद्धा पेरणीची घाई करू नये, असे आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात येत आहे.

१ जूननंतर विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मान्सूनपूर्व सरी कोसळतील, असा अंदाज आहे. परंतु कमाल तापमान अधिकच असेल. या कालावधीत मुंबई आणि कोकणात ढगाळी वातावरण आणि किरकोळ पाऊस पडेल. या कालावधीत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळ आणि वीजांपासून नागरिकांनी आपले संरक्षण करावे आणि पुरेशी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

या कालावधीत झाडांखाली, मोकळ्या जागेत, पत्र्याच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ नये, तर सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, असेही आवाहन करण्यात येत आहे.