Breaking News

दखल - भाजपला मित्रप्रेमाचा धक्का!

शिवसेना व भाजपत दररोज खडाजंगी होत असताना त्यांच्यात मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी न बोलताही युती झाली. उलट, गेल्या दोन-तीन महिन्यांपासून मित्रप्रेमाचं भरतं आलेल्या दोन्ही काँग्रेसमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीच्या जागा वाटपावरून चांगलीच खडाखडी झाली. त्यानंतर जागांची अदलाबदल करून तडजोड झाली. त्यातच भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वणगा यांच्या कुटुंबीयांना शिवसेनेत प्रवेश देऊन एकही माराचा तडाखा काय असतो, हे दाखवून दिलं आहे. विधान परिषदेसाठी कागदावरचे मित्रप्रेम आणि शिवसेनेचं तडाखा देऊन व्यक्त झालेलं प्रेम पाहिलं, तर राज्यात सारं काही आलबेल नाही, हे लक्षात येतं. अर्थात दोन्ही काँग्रेसला पूर्वीच्या जागा टिकविणं अवघड दिसतं.


गेल्या पाच महिन्यांपासून शिवसेना व भाजपचे संबंध अतिशय ताणले गेले होते. कोणत्याही परिस्थितीत भाजपबरोबर युती करणार नाही, असं शिवसेनेचे नेते सांगत होते. भाजप मात्र युती होण्याबाबत खात्रीनं सांगत होता. विधान परिषदेला युती आणि आघाडी झाल्याचं वरवरचं चित्र असलं, तरी प्रत्यक्षात अंतर्गत बराच संघर्ष चालू आहे, असं दिसतं. शिवसेनेच्या मुखपत्रातून दररोज भाजपवर कडवी टीका केली जात आहे. उद्धव ठाकरे दररोज भाजपचा पाणउतारा करीत आहेत. त्याचबरोबर वणगा यांच्या कुटुंबीयांना शिवसेनेत प्रवेश देऊन भाजपनं पूर्वी अन्य पक्षांच्या नेत्यांना कसं फोडलं, याचं तितक्याच कणखरपणे उत्तर दिलं. भाजपनं वणगा यांच्या कुटुंबीयांपैकी एकाला उमेदवारी देण्याचं कबूल केलं होतं, असं आता सांगितलं जात असलं, तरी त्यावर कुणी विश्‍वास ठेवायला तयार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे वणगा कुटुंबीयांचे फोन उचलत नसतील आणि लघुसंदेशाला उत्तर देत नसतील, तर त्यांनी मातोश्री गाठली, तर त्यात त्यांची चूक नाही. आता भाजपची धावपळ उडाली आहे. शिवसेना पालघर मतदारसंघातून वणगा यांना उमेदवारी देण्याची शक्यता असून भाजपनं आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा यांना लोकसभेसाठी उतरविण्याची तयारी केली आहे; परंतु एक वर्षासाठी सावरा लोकसभेत जायला तयार दिसत नाहीत. त्यामुळं तर त्यांनी सावध पवित्रा घेतला आहे.
देशातील बदलतं वातावरण पाहून भाजपच्या विरोधात आघाडी करण्याचे मनसुबे रचून कार्यकर्त्यांची तशी मानसिकता तयार करणारे दोन्ही काँग्रेसचे नेते विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं परस्परांना ताकदीची, रडीच्या डावाची आठवण करून द्यायला लागले. विधान परिषदेच्या जागांसाठी तसेच लोकसभा व विधान सभेच्या पोटनिवडणुकीसाठी आता दोन्ही काँग्रेसच्या वाटाघाटी झाल्या असल्या, तरी गोंदिया-भंडारा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडणे आणि परभणी-हिंगोली मतदारसंघ काँग्रेसला सोडणं तेथील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना रुचलेलं दिसत नाही. लातूर, बीड व उस्मानाबाद या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या जागेवरून असलेला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद अखेर मिटला आहे. लातूर-बीड-उस्मानाबाद ही जागा काँग्रेसनं राष्ट्रवादीला सोडली आहे, तर त्या बदल्यात परभणी-हिंगोलीची जागा राष्ट्रवादीनं काँग्रेसला दिली आहे. कोकण, नाशिक व लातूर या तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार असून वर्धा, अमरावती आणि परभणी या जागा काँग्रेसला देण्यात आल्या आहेत. काँग्रेसला अमरावती, वर्धा, परभणी या जागा देण्यात आल्या आहेत. कोकण, नाशिक, वर्धा व अमरावती या चार जागांवर शिवसेना-भाजप युतीचं वर्चस्व आहे. उर्वरित लातूर व परभणी या दोन जागांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचं बळ जास्त आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं उमेदवारीची बरीच उपकथानकं घडली. नरेंद्र दराडे यांनी राष्ट्रवादी, शिवसेना, राष्ट्रवादी व आता पुन्हा शिवसेना असा प्रवास करून आमदारकी पदरात पाडून घ्यायचं ठरविलं आहे. त्यांना शिवसेनेनं उमेदवारी देताच शिवसेनेच्या तेथील इच्छुकानं राष्ट्रवादीत उडी घेऊन उमेदवारी पदरात पाडून घेतली. भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या रमेश कराड यांना बीडमधून उमेदवारी देण्यात आली, तर राष्ट्रवादीतून भाजपत गेलेल्या सुरेश धस यांना भाजपची उमेदवारी मिळाली. दुसरीकडं कोकणात राष्ट्रवादीची घराणेशाहीची परंपरा कायम राहिली आहे. पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपले चिरंजीव अनिकेत तटकरे यांना विधान परिषदेचं तिकीट मिळवून दिलं आहे. याआधी कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून तटकरे यांचे ज्येष्ट बंधू अनिल तटकरे आमदार होते. त्यांचे पुतणे अवधूत तटकरे हेसुद्धा विधानसभेचे आमदार आहेत. तटकरे यांची कन्या रायगड जिल्हा परिषदेची अध्यक्ष आहे. स्वत: तटकरे विधान परिषदेचे आमदार आहेत. तटकरे यांची विधान परिषदेची मुदत संपत आल्यानं त्यांनी मुलाला पुढं केलं असावं. राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून काम पाहताना त्यांच्याकडं सत्तेतील कोणतंच पद असणार नाही. स्वाभिमानी पक्षाचे नेते खासदार नारायण राणे यांनी आपला उमेदवार कोकणात निवडणुकीतच्या रिंगणात उतरवलेला नाही. मात्र, शिवसेनेचा उमेदवार पाडण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी जाहीर केले आहे. त्यांच्याकडं 92 मतं आहेत. मात्र, शिवसेना व भाजपची युती झाली असल्यामुळं आता तटकरे काय चमत्कार घडवतात, हे पाहायचं.
विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसला सुटल्यानं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा चांगलाच हिरमोड झाला. या मतदारसंघाचं नेतृत्व राष्ट्रवादीचे आ़ बाबाजानी दुरार्णी हे करीत आहेत़ राष्ट्रवादीनं तीन दिवसांपूर्वी आ़ दुरार्णी यांना दुसर्‍यांदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरविण्याच्या उद्देशानं एबी फॉर्मही दिला होता़ त्यानंतर आ़ दुरार्णी यांनी 3 मे रोजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार गुरुवारी सकाळी 10 वाजल्यापासूनच शहरातील राष्ट्रवादी भवन येथे परभणी व हिंगोली जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक, पदाधिकारी जमा झाले होते. पण, सकाळी 10च्या सुमारास राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा़ शरद पवार यांनी आघाडीतील जागा वाटपानुसार परभणीची जागा काँग्रेसला सोडली असून, तुम्ही उमेदवारी दाखल करू नका, असं आ़ दुरार्णी यांना सांगितलं. त्यानंतर दुरार्णी यांनी खा़ पवार यांना पक्षानं घेतलेला निर्णय आपणास मान्य असल्याचं सांगितलं.
पक्षाच्या परभणी मनपातील 19 नगरसेवकांनी सामूहिक राजीनामे देण्याची तयारी चालविली़ काही जिल्हा परिषद सदस्यही सामूहिक राजीनाम्याची भाषा करू लागले़ वातावरण गरम झालं. त्यानंतर आ़ दुरार्णी, आ़ मधुसूदन केंद्रे, आ़ विजय भांबळे यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली़ याच वेळी काँग्रेसचे उमेदवार सुरेश देशमुख व जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर हेही राष्ट्रवादी भवनमध्ये दाखल झाले़. त्यांनीही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल, असं सांगून त्यांच्या विश्‍वासाला तडा जाऊ देणार नाही, असं आश्‍वासन दिलं. नाशिकमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यानं बंडखोरी करत अर्ज दाखल केल्यानं युतीत अस्वस्थता आहे. नाशिकमध्ये कालपर्यंत शिवसेनेत असलेले शिवाजी सहाणे आता राष्ट्रवादीकडून रिंगणात आहेत, तर राष्ट्रवादीचे नरेंद्र दराडे यांनी शिवसेनेची उमेदवारी घेतली आहे. उमदेवारांच्या या उसनवारीनं निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे. लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकीतही काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडी झाली आहे. त्यानुसार भंडारा-गोंदियाची जागा राष्ट्रवादी, तर पालघर आणि पलूस या ठिकाणी काँग्रेस लढणार आहे. भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी राजीनामा दिला होता. त्यांना उमेदवारी मिळेल, असं गृहीत धरून काँग्रेसजण व तेही तयारीला लागले होते. परंतु, ही जागाच राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्यानं आणि तेथून प्रफुल्ल पटेल हे उमेदवार असल्यानं काँग्रेस मदत करणार का, हा खरा प्रश्‍न आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा सदस्य नारायण राणे यांनी कोकणच्या विधान परिषद निवडणुकीत स्वत:चा उमेदवार दिला नाही; पण त्याचवेळी शिवसेनेचा उमेदवार आपण विजयी होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यावरून युतीमध्ये बेबनाव निर्माण होऊ शकतो. भाजपचे विद्यमान आमदार व राज्यमंत्री प्रवीण पोटे यांचा अपवाद वगळता अन्य पाच आमदारांना घरी बसवून नवीन चेहर्‍यांना संधी देण्यात आली आहे. विधान परिषदेत सध्या राष्ट्रवादी व काँग्रेसचे वर्चस्व आहे. सत्ताधारी भाजपसाठी तीच मोठी राजकीय अडचण आहे. त्यामुळं भाजपला आपलं संख्याबळ वाढविण्यासाठी आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला आपलं वर्चस्व कायम राखण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे.