प्रदूषित नद्यांमध्ये पवना आणि इंद्रायणीचा समावेश
पुणे - सर्वाधिक प्रदूषित नद्यांमध्ये पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीतून वाहणा-या पवना आणि इंद्रायणी नद्यांचा समावेश आहे. नुकतेच केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने प्रसिद्ध के लेल्या अहवालातून हे समोर आले आहे. शहरातील नद्यांची सर्वाधिक प्रदूषित नद्यांमध्ये गणना होणे हे खासदार, आमदार आणि पालिकेतील पदाधिका-यांसाठी लाजीरवाणी बाब असून विचार क रायला भाग पडणारी आहे. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळेच नद्या प्रदूषित राहिल्या असल्याचा आरोप, पर्यावरण प्रेमींकडून केला जात आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीतून पवना आ णि इंद्रायणी नद्या वाहतात. शहरातून वाहत असलेले पवनेचे पात्र 18 किलोमीटर असून इंद्रायणीचे 16 किलोमीटर आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे शहराची जीवनदायीनी असलेल्या पवना व इंद्रायणी या गटारगंगा झाल्या आहेत. पालिकेचे शहरातील वीस टक्के सांडपाणी आणि बहुतांश उद्योगांचे रसायनमिश्रित पाणी विनाप्रक्रिया नदीत सोडले जात आहे. कचराही टाकण्यात येतो. यामुळे नद्यांच्या प्रदूषणाने अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. त्यामुळे पवना आणि इंद्रायणी नदीची प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्या आहेत. दूषित नद्या सुधारण्यासाठी केंद्र सरकारने नमामी गंगा योजनेअंतर्गत नदी सुधार प्रकल्प हाती घेतला आहे. या योजनेत शहराच्या हद्दीतून वाहणा-या इंद्रायणी आणि पवना नद्यांच्या समावेश करण्यात शिवसेनेच्या दोन खासदारांना आणि भाजपच्या राज्यसभेतील एका खासदाराला अपयश आले आहे. लोकप्रतिनिधींकडून याचे राजकारण केले जात आहे. त्यासाठी मनापासून प्रयत्न करणे गरजेचे आहे.