Breaking News

तडवळ भागात वाळू तस्करी

सोलापूर - अक्कलकोट तालुक्यातील वाळू तस्करीविरोधात महसूल विभाग तहसील कार्यालयाकडून मंडल अधिका-यांच्या नेतृत्वाखाली सात ते आठ कर्मचा-यांचे गठीत केलेले पथक केवळ कागदावरच राहिले आहे. यामुळे तडवळ भागातील सीना-भीमा नदीपात्रातील विविध ठिकाणांहून वाळू तस्करी जोरात सुरु असल्याचे चित्र आहे. तडवळ भागातील शेगाव, धारसंग, देवीकवठे, कुडल, खानापूर, अंकलगे, म्हैसलगे, आळगे, गुड्डेवाडी या भागांतील सीना-भीमा नदीपात्रातून अवैधपणे मोठ्या प्रमाणात वाळू उपसा गेल्या सहा-सात महिन्यांपासून चालू आहे. याविरोधात तहसीलदार अक्कलकोट यांनी पायबंद घालण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करुनही हा प्रकार थांबत नसल्याचे लक्षात आले. यामुळे अक्कलकोट, वागदरी, चपळगाव, मैंदर्गी, दुधनी, जेऊर, तडवळ, करजगी, किणी या नऊ मंडल अधिकार्यांना आदेश काढून आठवड्याच्या रविवारी, दुधनी मंडल अधिकारी बेलभंडारे यांच्या नेतृत्वाखाली तलाठी एस.आर.चव्हाण, आर.एस. भासगी, जी.यू.जाधव, टी.एन. थोरात, ए.ए. तेरदाळ व त्यांच्यासोबत एक सशस्त्र पोलिस नेमला आहे.