औरंगाबाद दंगल- शिवसेना नगरसेवकाला घेतले ताब्यात पोलीस पोहचण्याआधीच एमआयएम नगरसेवक फेरोज खान पसार
औरंगाबाद - शहरात झालेल्या दंगलीप्रकरणी पोलिसांनी शिवसेनेचे नगरसेवक तथा माजी सभागृह नेते राजेन्द्र जंजाळ यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर व्यावसा यिकांनी आपली दुकाने बंद केली आहे. जंजाळ यांच्या कार्यकर्त्यांनी क्रांती पोलीस ठाण्यामध्ये गर्दी केली आहे. औरंगाबाद शहरातील शहागंज, शहाबजार आणि राजाबाजार या प रिसरात शुक्रवारी रात्री भीषण दंगल उसळली होती. या दंगलीत दोन जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी आज दंगल प्रकरणी संशयितांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे. शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ हे सुद्धा एका व्हिडिओमध्ये दगडफेक करताना दिसत आहेत. याच व्हिडिओचा आधार घेवून पोलिसांनी आज जंजाळ यांना ताब्यात घेतले आहे. जंजाळ यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतल्यानंतर त्यांचा प्रभाग असलेल्या शिवाजीनगर परिसरात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे दुकाने बंद केली. त्यामुळे पुन्हा एकदा शहरातील वातावरण चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा एमआयएम नगरसेवक फेरोज खान यांच्याकडे वळवला होता. मात्र, पोलीस घरी पोहोचण्याआधीच फेरोज खानने धूम ठोकली आहे. परिणामी पोलिसांना रिकाम्या हातीच परतावे लागले आहे. या दंगलीत वेगवेगळ्या राजकीय पक्षांचा सहभाग होता. याबाबतच्या अनेक व्हिडिओ क्लिप देखील पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. त्यानंतर या क्लिपनुसार पोलिसांनी विविध राजकीय पक्षांच्या संशयित पदाधिकार्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे.