Breaking News

भुजबळांपासून दादांपर्यंत कार्यकारी अभियंता वेदपाठकांची मोहीनी मुख्य अभियंता किडे यांचा वरदहस्त

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी - परिवर्तन ही निसर्गाची आणि बदली शासकीय सेवेची अपरिहार्यता असली तरी कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम मंडळाचे कार्यकारी अभियंता वेदपाठक यांनी या अपरिहार्यतेवर कौशल्याने मात केली आहे. छगन भुजबळ ते चंद्रकांत दादा पाटील अशा दोन साबां मंत्र्यांच्या कालावधीत तब्बल सहा वर्षाची टर्म पुर्ण केल्यानंतरही करवीर नगरीचा सहवास वेदपाठक यांना सुटत नसल्याने अंबापुरीच्या साबांत ‘दाल में कुछ काला’ असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

सहा वर्ष एकाच सदनात काम करण्याची संधी आपल्या लोकशाही व्यवस्थेत केवळ विधानपरिषद आणि राज्यसभा या दोन वरिष्ठ सभागृहातच मिळू शकते असाआपला समज असेल तर तो कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम मंडळाचे कार्यकारी अभियंता वेदपाठक यांनी साफ गैर ठरविला आहे. शासकीय सेवेत तीन वर्षांनी बदली होणे नोकरदारवर्गाची अपरिहार्यता असली तरी या अपरिहार्यतेवर कार्यकारी अभियंता वेदपाठक यांनी कौशल्याने मात केली आहे.
सध्या इडीच्या न्यायालयीन कोठडीत असलेले माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या काळात कोल्हापूर साबां मंडळात (रेग्युलर) कार्यकारी अभियंता म्हणून रूजू झालेले वेदपाठक विद्यमान साबां मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा कार्यकाळ संपण्यास अवघे काही महीने शिल्लक असतानाही वेदपाठक अद्याप कोल्हापूरमध्येच आहेत. या काळात वेदपाठक यांच्या अखत्यारीत झालेल्या कामांमध्ये प्रचंड अनागोंदी झाल्याची चर्चा ओघानेच सुरू आहे. विशेष म्हणजे कोल्हापूर साबां प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता किडे यांचा वरदहस्त कार्यकारी अभियंता वेदपाठक यांच्या डोक्यावर असल्याने अनियमितता, अनागोंदी या बाबी वेदपाठक यांच्या अंगवळणी पडल्या आहेत. वेदपाठक आणि किडे यांच्या संगनमतामुळे अधिक्षक अभियंता साळुंखे यांचा कोंडमारा होत असून त्यांच्या हतबलतेचा फायदा लाटून त्यांची बदनामी केली जात आहे.
चंद्रकांत दादा पाटील यांची जन्म कर्मभूमी असलेल्या करवीर नगरीत सलग सहा वर्ष सेवा देण्याची संधी साधून साबांत भ्रष्टाचार पचविण्याचे धाडस दाखविणारे कार्यकारी अभियंता वेदपाठक यांच्या कार्य कुंडलीचा परामर्श उद्यापासून. (क्रमशः)