Breaking News

विद्यार्थ्यांनी आदर्श निर्माण करावा- म्हस्के

प्रवरेत शिक्षण घेतलेली अनेक मुले जगातील प्रगत समजल्या जाणाऱ्या अनेक देशांत काम करीत आहेत, हेच पद्मश्री विखे पाटील यांच्या दूरदृष्टीचे फलित आहे. येथून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्षेत्रात काम करताना ते काम प्रामाणिकपणे करून आदर्श निर्माण करावा, असे आवाहन माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी केले. 


लोणी येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सैनिकी स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यास या विद्यालयाचे माजी कमांडंट कर्नल दिलीप परब, गीता परब, कर्नल नीरज सिन्हा, प्राचार्य धनेश गांधी, प्रवरा ग्रामिण शिक्षण संस्थेचे सह सचिव भारत घोगरे, संचालक आबासाहेब घोलप, शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, शिक्षणाधिकारी प्रा. शिवाजी रेठरेकर प्रा. विजय आहेर, ज्योती भारत कुमार, प्राचार्य सुधीर मोरे, प्राचार्य शेळके आदी उपस्थित होते. 

प्रारंभी सैनिकी विद्यालयाचे कमांडंट कर्नल डॉ. भारतकुमार यांनी प्रास्तविक केले. दोन दिवस चाललेल्या या मेळाव्यास देश विदेशातील सुमारे तीनशे माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. विविध क्रीडा स्पर्धा, आजी माजी विद्यार्थी सवांद, सांस्कृतिक कार्यक्रम, रक्तदान शिबिर, विविध चर्चासत्रे यावेळी आयोजित केली होती. शिक्षक आणि शिक्षकेतर सेवकांचा या वेळी सत्कार करण्यात आला. 

माजी मंत्री म्हस्के पाटील यांनी माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करून भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्या दिल्या. मेळाव्यासाठी माजी विद्यार्थी प्रतिनिधी ज्ञानेश्वर ठुबे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचलन प्रा. राजेश माघाडे यांनी केले. प्राचार्य सुधीर मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.