Breaking News

दखल - दलिताच्या घरी जेवणाचं नाटक

गुजरातमधील उना प्रकरण, उत्तर प्रदेशातील सहारनपूरच्या दंगली, राजस्थानमध्ये झालेल्या जातीय दंगली, त्यात दलितांवर झालेले अत्याचार, गोरक्षकांचे हल्ले यामुळं दलित समाज भाजपवर नाराज झाला आहे. या समाजानं राजस्थानच्या निवडणुकीत भाजपला धडा शिकविला. उत्तर प्रदेशात तसंच गुजरातमध्येही हा समाज आता भाजपपासून दुरावत चालला आहे. मुस्लीम आणि दलित समाज भाजपपासून दुरावणं पक्षाच्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं धोकादायक आहे. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या नेत्यांना दलित वस्त्यांत जाऊन दलित समाजाशी संपर्क वाढविण्याचा सल्ला दिला आहे. परंतु, भाजपचे नेते हा सल्ला गांभीर्यानं घ्यायला तयार नाहीत.

मनं जुळलेली असतील, तरच मनात जात राहत नाही. निवडणुकीसाठी जातीचं राजकारण करणं वेगळं आणि उच्च-नीचतेचा भाव मनात असताना दलिताच्या घरी जाऊन जेवणाचं नाटक करणं वेगळं. एकीकडं उच्चवर्णीयांच्या हल्ल्याप्रकरणी दलितांना न्याय न मिळाल्यानं मोदी यांच्या गुजरातमधील दलितांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्मात प्रवेश केला आहे. दलितांना माणुसकीची वागणूक मिळत नसेल, तर हा समाज अन्य पर्याय शोधेलच. त्याबाबत त्याला दोष देता येणार नाही. 21 व्या शतकात जातीअंताची लढाई करण्याची वेळ आली असताना मनात खोलवर रुजलेल्या जाती व्यवस्था अजून ही बाहेर जात नसतील, तर ही लढाई लढणंच अशक्य. एकीकडं सरकार आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देत असताना दुसरीकडं असे विवाह करणार्‍यांना जातीबहिष्कृत केलं जात असेल, तर काम किती अवघड आहे, हे लक्षात येतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आमदार आणि मंत्र्यांना दलित बहुल भागात जाऊन तिथं वेळ व्यतीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पक्षापासून दलित समाज दूर जाऊ नये, हा यामागचा उद्देश आहे. मोदींचा आदेश तात्काळ अंमलात आणणारे उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री सुरेश राणा आता यावरून एका वादात अडकले आहेत. राणा हे सोमवारी एका दलिताच्या घरी जेवण करण्यास गेले होते. परंतु, दलित कुटुंबानं केलेल्या स्वयंपाकाऐवजी त्यांनी हॉटेलमधून मागवलेल्या पदार्थांचा आस्वाद घेतल्याचा आरोप आता केला जात आहे. राणा आणि भाजपचे अनेक नेते अलिगढ जिल्ह्यातील लोहगढ येथे राहणार्‍या रजनीश कुमार यांच्या घरी रात्री 11 च्या सुमारास गेले. मंत्री आपल्या घरी येणार आहेत, याची रजनीश यांना काहीच माहिती नव्हती. सर्व काही पूर्वनियोजित पद्धतीनं करण्यात आलं. रजनीश कुमार यांना घरी बसण्यास सांगण्यात आलं होतं. रात्रीचं जेवण बाहेरून मागवण्यात आलं. जेवणात दाल मख्खनी, मटार पनीर, पुलाव, तंदुरी रोटी आणि गुलाब जामून मागवण्यात आले होते. त्याचबरोबर पाणीही बाहेरून आणलं होतं. राणा यांनी हा आरोप फेटाळाला. आपल्याबरोबर त्या वेळी सुमारे 100 लोक आले होते. त्यामुळं जेवण बाहेरून मागवलं होतं. मी त्यांच्या ड्राँईंग रूममध्ये जेवण केलं. रजनीश यांच्या कुटुंबीयांनी बनवलेल्या अन्न पदार्थांसह हलवायाकडूनही स्वयंपाक तयार करण्यात आला होता, असं त्यांनी सांगितलं असलं, तरी रजनीशकुमार यांनी दिलेली माहिती मात्र वेगळीच आहे. त्यामुळं बाहेरून जेवण मागवून दलिताच्या घरी ते खाल्लयानं दलित समाज मागं येईल, हा भ्रम आहे. पंतप्रधान मोदींच्या धोरणानुसार गेल्या महिन्यात भाजपनं ग्राम स्वराज अभियानाची सुरुवात केली आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या खासदार, आमदार आणि केंद्रीय मंत्र्यांना 50 टक्क्यांहून अधिक दलित लोकसंख्या असलेल्या भागात किमान एक रात्र घालवण्यास सांगितलं आहे. त्याचबरोबर कल्याणकारी योजनांची जनतेला माहिती देण्यासही सांगितले होतं. गेल्या महिन्यात पुकारण्यात आलेल्या भारत बंद आंदोलनात दलितांचा सरकारवर असलेला संताप दिसून आला होता. त्याचबरोबर भाजपचे काही दलित नेते आणि इतर दलित नेत्यांनी भाजपकडून दलितांकडं दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप केला होता.
भाजपच्या नेत्यांना झालंय तरी काय असा प्रश्‍न सगळ्या देशालाच पडला आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे या नेत्यांची एकामागोमाग एक समोर येणारी वक्तव्यं. बिपल्ब देब, विजय रुपाणी यांच्यापाठोपाठ आता केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या नेत्या उमा भारती यांनीही वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मी दलितांच्या घरी जेवण करत नाही. मी काही प्रभू रामचंद्र नाही, की त्यांच्या घरी जेवल्यानं ते पवित्र होतील, असं वादग्रस्त वक्तव्य उमा भारती यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटणार यात काहीही शंका नाही. मध्य प्रदेशातील छत्तरपूर या ठिकाणी असलेल्या ददरी गावात लोकांशी संवाद साधत असताना उमा भारती यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. दलित समाजाच्या माणसाच्या घरी मी जेवत नाही. कारण मी काही प्रभू रामचंद्र नाही, की त्याच्या घरी जेवल्याने तो पवित्र होईल असे त्या म्हणाल्या. त्यानंतर दलित बांधवांनी माझ्या घरी येऊन जेवण करावं. मी त्यांच्यासाठी आपल्या हातानं जेवण तयार करेन. त्यांना वाढेन ते मला आवडेल. असं घडलं, तरच समाजातील तेढ दूर होईल. सामाजिक समरसता भोजन कार्यक्रमांमध्ये जेवल्यानं नाही असंही त्यांनी म्हटलं. मात्र काही वेळानं आपण काय बोलून बसलो, याची उपरती उमा भारती यांना झाली. या गावात समरसता भोजन कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे, याची माहिती मला नव्हती. दलित समाजाच्या लोकांच्या घरी जाऊन त्यांना भेटणं, त्यांची विचारपूस करणं, त्यांच्या घरी जेवण करणं या सगळ्या गोष्टी आता मागं पडल्या आहेत, असं मत उमा भारती यांनी नोंदवलं. राजकारणातही दलितांसोबत भेदभाव केला जातो तो दूर झाला पाहिजे, दलितांच्या आर्थिक समृद्धीसाठी आणि त्यांना समाजात एक चांगलं स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असं उमा भारती यांनी आपल्या स्पष्टीकरणात म्हटलं आहे. परंतु, त्यानं काहीच साध्य झालं नाही. दलित समाजात जी नाराजीची भावना निर्माण झाली, ती नंतरच्या खुलाशानं दूर झाली नाही.