Breaking News

दुधाच्या हमीभावासाठी आंदोलन दूध ओतून सरकारचा निषेध

आश्वी : प्रतिनिधी - राज्य सरकाकडून जाहीर करण्यात आलेला दूधाचा हमीभाव दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील आश्वी परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी अहिंसक मार्गाने आंदोलन सुरु केले. याप्रसंगी आश्वी बुद्रक येथे रस्त्यावर दूध ओतुन सरकारचा निषेध करण्यात आला. या आंदोलनाची सरकारने वेळीच दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे. 

सरकारने उत्तम दर्जाच्या दुधाला २७ रुपये प्रतिलिटर हमी दर निश्‍चित केले आहेत. मात्र प्रत्यक्षात दूध उत्पादक शेतकऱ्यांना खासगी डेअऱ्या आणि संघ हा भाव देत नाहीत. केवळ १६ ते २० रुपयांवर त्यांची बोळवण केली जाते. त्यामुळे कुटुंब व शेतीचा आधार असलेला दूध धंदा संकटात सापडला असल्याची भावना आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यानी बोलून दाखविली. दुधाचे दर मागील अनेक महिन्यांपासून घसरल्यामुळे दूध धंद्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे अर्थकारणच पूर्णपणे कोलमडले आहे. जनावरांना आणि स्वत:ला जगवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे येथील शेतकरी अतिशय आक्रमक झाले आहेत. 

सरकार जर जाणीवपूर्वक या आंदोलनाकडे डोळेझाक करणार असेल तर दूध आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा बबन मांढरे, प्रविण उंबरकर, मनोज गायकवाड, भाऊसाहेब गायकवाड, दत्तात्रय वाघमारे, महेश सारबंदे, केरुनाथ खेमनर, रविंद्र बालोटे आदी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने दूध उत्पादक शेतकरी व ग्रामस्थ सहभागी झाले उपस्थित होते.