Breaking News

शालेय अभ्यासक्रमात शेतीशास्त्राचा समावेश व्हावा : प. पू. मोरे

प्रवरानगर / प्रतिनिधी  - हरितक्रांतीच्या हव्यासापोटी हायब्रीड आणि किटकनाशकांच्या अतिवापरामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक दुर्धर आजार बरे करण्याची क्षमता असलेल्या वनस्पतींचे संवर्धन करतानाच जुन्या पिढीने नव्या पिढीला शेतीची गोडी निर्माण होण्यासाठी विश्वासात घ्यावे. इतिहास सांगत अध्यात्मातून शेतीचे ज्ञान ५ ते १८ वर्ष वयोगटातील तरुणाईला मिळावे, यासाठी शालेय अभ्यासक्रमात शेती शास्त्राचा समावेश व्हावा, अपेक्षा गुरुमाऊली प. पू. अण्णासाहेब मोरे यांनी व्यक्त केली.

पद्मभूषण माजी खा. डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. याप्रसंगी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के, आ. भाऊसाहेब कांबळे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अण्णासाहेब शेलार, साई संस्थांचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, राजेंद्र जाधव, अविनाश आपटे, राहुल झावरे, जि. प. अध्यक्षा शालिनी विखे, डॉ. राजेंद्र विखे, डॉ. सुजय विखे आदीउपस्थित होते.

प्रारंभी या कार्यक्रमात पायरेन्स, प्रवरा सहकारी बँक आणि जनसेवा फाउंडेशनच्यावतीने उतरविण्यात आलेल्या अपघात विमा योजनेतील लाभार्थी, रमाई घरकुल योजना, कोरडवाहू अभियानातंर्गत शेती अनुदान, जिल्हा परिषद शेष फंडातून अपंगाशी विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहन अनुदान, आणि आत्महत्याग्रस्त कुटुंबातील व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले.

प. पू. मोरे म्हणाले, कृषी, आरोग्य आणि पर्यावरण या विषयावर खूप काही करण्याची संधी आहे. अनेक रोग बरे करण्याची क्षमता असलेल्या वनस्पतींचे संवर्धन करण्याची आवश्यकता आहे. कृषी मेळाव्यांद्वारे नव्या पिढीला अध्यत्मातून शेतीचे संस्कार देताना स्वयंपाक घरातील वस्तूंमध्ये असलेले औषधी गुणधर्म महिलांना माहित असावेत, यासाठी अध्यात्माद्वारे सक्षम भावी पिढी घडविण्याचे काम विविध केंद्रामार्फत सुरु आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी कृषीमंत्री असताना कृषी प्रदर्शन सुरु करून खूप मोठे काम उभे केले आहे. पद्मभूषण माजी खा. बाळासाहेब विखे यांनी शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन राज्य आणि देशातील विविध समस्यांचे चिंतन करत मार्ग काढला. विखे यांच्या एका एका पैलूवर मोठे चिंतन करता येईल.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, समृद्ध आणि सुजाण पिढी घडविण्याचे काम गुरु माऊली यांनी केले आहे. देव, देश आणि राष्ट्रधर्माचा होणारा हा जागर तरुण पिढीने अंगिकारण्याची आवश्यकता आहे. अध्यात्माची जोड दिल्याशिवाय शेतीला आता पर्याय नाही. शेती क्षेत्रामध्ये अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या नावाने पुरस्कार सुरु करणार आहोत. यासाठी एक समिती स्थापन करणार आहोत. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील विविध संस्थांचे प्रतिनिधी, शेतकरी आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्यावर प्रेम करणारे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे यांनी आभार व्यक्त मानले.