Breaking News

मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण


केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार या महिन्यात आपली चार वर्षे पूर्ण करत आहे. त्यानिमित्त भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची एक बैठक बोलावली असून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विजयाचा मंत्र शहा याप्रसंगी पदाधिकाऱ्यांना देणार आहेत.

भाजपाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. १४ मे रोजी शहा यांनी पक्षाच्या सर्व प्रदेश समित्यांचे प्रमुख, संघटन मंत्री आणि केंद्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत अमित शहा प्रदेश समित्यांचे अध्यक्ष, संघटन मंत्री आणि पदाधिकाऱ्यांकडून त्यांनी चार वर्षांत केलेल्या कामाचा हिशेब घेणार आहेत. तसेच आगामी निवडणुकीवर लक्ष ठेवून मोदी सरकारने केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आदेश या बैठकीत देण्यात येणार आहेत. या बैठकीनंतर १७ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षाच्या सर्व उपसंघटना व सयुक्त कार्यकारी समितीच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत. याप्रसंगी अमित शहा हेदेखील उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर १८ ते २० मे असे तीन दिवस गुडगाव येथे पदाधिकाऱ्यांसाठी राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.