Breaking News

देशभरात उष्णतेची लाट कायम कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ

नवी दिल्ली : मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे विदर्भातील चंद्रपूर येथे सर्वाधिक 46.8 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. उन्हाचा चटका दिवसेंदिवस वाढत आहे. मध्य महाराष्ट्रातही हीच परिस्थिती असून, पुणे शहरातील लोहगाव येथे 39.9 अंश कमाल तापमानाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भासह मराठवाड्याच्या काही भागांत कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे. येत्या दोन दिवसांत विदर्भातील काही भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाडा चांगला तापू लागला आहे. त्याचबरोबर यंदा मध्य महाराष्ट्रातील बहुतांश शहरांमधील कमाल तापमान 40 अंशाच्या पुढे गेल्याने चटका’ असह्य झाला आहे. उष्माघाताचा धोका वाढल्याचे दिसून येत आहे.

राजस्थानमधील अजमेर, बिकानेर, जोधपूर आणि कोटा भागामध्ये तर उष्णतेने उच्चांक गाठला. जैसलपूरचे तापमान 46.5 अंश सेल्सिअस एवढे नोंदवल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. जैसलमेरनंतर चुरू येथील तापमान 46.4 आणि बिकानेर 46.2 अंश सेल्सिअस एवढे नोंदवले गेले. मागील 24 तासात जयपूर, बिकानेर, कोटा आणि अजमेर येथे हलक्या पावसांच्या सरीसह गडगडाटी वादळदेखील अनुभवायला मिळाले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 5 दिवसांमध्ये पश्‍चिम राजस्थानसह विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातदेखील उष्णतेचा हा परिणाम पोहोचेल.
दरम्यान, पुढील दोन दिवस गोव्यासह राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, लोहगाव येथे 39.9 अंश सेल्सिअस, शहरात 38.1 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. उन्हाचा वाढता चटका पुणेकरांना नकोसा करत आहे. त्यामुळे दुपारच्यावेळी रस्त्यावर वाहनांची आणि पायी चालणार्‍या नागरिकांची वर्दळ खूपच कमी असते. येत्या दोन दिवसांत शहरातील हवामान कोरडे राहील तर कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.