Breaking News

छोटा राजनसह 9 जणांना जन्मठेप

मुंबई : पत्रकार ज्योतिर्मय (जे) डे खून प्रकरणी मकोका न्यायालयाने अंडरवर्ल्डचा कुख्यात डॉन छोटा राजनला दोषी ठरवले असून, छोटा राजनसह 9 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या हत्या प्रकरणातील आरोपी पत्रकार जिग्ना वोरा आणि पॉलसन जोसेफ यांना न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. या खून प्रकरणात छोटा राजनदेखील आरोपी होता. जवळजवळ 7 वर्षांनंतर हा निर्णय येत आहे. छोटा राजन ( मुख्य सूत्रधार), सतीश कालीया (शुटर), अभिजीत शिंदे(बाईकर ), अरुण डाके (बाईकर), सचिन गायवाड (बाईकर), रेकी करणारे अनील वाघमोडे, निलेश शेंडगे, मंगेश अगावने, हत्यारे पुरवणारा दीपक सिसौदिया आणि विनोद चेंबुर या दोषींना जन्मठेप सुनावण्यात आली आहे. या हत्या प्रकरणात क्राईम ब्रांचने आरोपपत्र दाखल केल्यानंतर प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले होते. सीबीआयने तपासाअंती 5 ऑगस्ट 2016 मध्ये पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर न्यायालयाने 31 ऑगस्ट 2016 मध्ये आरोपींवर आरोप निश्‍चित केले होते. सरकारी आणि बचाव पक्षाकडून साक्षी पुरावे नोंदवण्यात आले होते.

या हत्याप्रकरणात आतापर्यंत अटकेत असलेल्या आरोपींमध्ये अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन, पत्रकार जिग्ना व्होरा, सतीश काल्या, अभिजित शिंदे, अरुण डाके, सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे, नीलेश शेंडगे, मंगेश आगनावे, विनोद आसरानी, पॉलसन जोसेफ, सचिन गायकवाड यांचा समावेश होता. या प्रकरणात फरार आरोपी नयनसिंग बिस्त अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या आरोपींविरोधात जे.डे. यांच्या हत्येचा कट रचून प्रत्यक्ष हत्या करणे, मकोका तसेच शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्यानुसार खटला दाखल करण्यात आला होता. त्यापैकी विनोद आसरानीचा खटला सुरू असतानाच्या काळात मृत्यू झाल्याने फक्त 12 आरोपींविरोधात प्रत्यक्ष खटला चालविण्यात आला.