चाकू हल्ल्यातील युवकाचा मृत्यू
कोल्हार : मागील वादाच्या कारणावरून राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथे एक युवकाला चाकूने भोसकण्यात आले होते. यातील नरेंद्र राजेंद्र भोसले {रा. प्रवरानगर} या युवकाचा सहा दिवसांच्या उपचारादरम्यान काल सकाळी {दि. २१} मृत्यू झाला. याप्रकरणी लोणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. आरोपी लाला रंजन भोसले मात्र सध्या फरार आहे.
याप्रकरणी कुणाल किशोर भोसले {रा. हसनापूर} याने फिर्याद दिली हाती. आरोपी लाला रंजन भोसले आणि मयत राजेंद्र भोसले यांच्यात सुमारे दीड ते दोन महिन्यांपूर्वी वाद झाले होते. तेंव्हापासून लाला भोसले त्यास जीवे मारण्याच्या धमक्या देत होता. त्या भितीने मयत नरेंद्र भोसले हा काही दिवस बाहेरगांवी निघून गेला होता. मात्र दि. १७ मे रोजी रात्री ८ च्या सुमारास आरोपी लाला भोसले याच्या घरासमोरून मयत नरेंद्र भोसले जात असताना आरोपीने मयतास शिवीगाळ करून दमदाटी केली. आरोपी लाला भोसले याने यावेळी ‘आज तुझा शेवटच करून टाकतो’ असे म्हणत त्याच्या हातातील चाकूने नरेंद्र भोसले याच्या पोटात चाकू मारला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला लोणी येथील प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र सहा दिवसांनंतर काल सकाळी साडेसहाच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला.