Breaking News

सुयश क्लासेसच्या चिमुकल्यांनी जपली सामाजिक बांधिलकी


 नाशिक/प्रतिनिधी। 6 -  सारे जग 2015 ला अखेरचा निरोप द्यायचा म्हणून 31 डिसेंबरच्या धुंद रात्रीचे स्वप्न रंगविण्याची तयारी करीत असतांना, गोदाकाठावरील सुयश क्लासेसचे विद्यार्थी मात्र या वर्षअखेरच्या दिवशी सामाजिक बांधिलकीची उर्मी जागवत नव्या वर्षाचे स्वागत करण्यात दंग होते. 
31 डिसेंबर साजरा करायचा म्हणजे दारू पिऊन रात्रभर रस्त्यावर धिंगाणा घालायचा अशी संस्कृती विशेषत: तारूण्यात बळावत असतांना तारूण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या किशोरवयीन मुलांमध्ये मात्र हा दिवस अनाथांना आधार देण्यासाठी खर्च करण्याची कल्पना सुचली आणि सुयश क्लासेसचे संचालक पवन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष अंमलातही आणली. 
वय वर्ष 15... हसण्याबागडण्याचे, मित्रांसोबत मस्तीत दंग होण्याचे. तरीही या वयोगटातील सुयश क्लासेसच्या 50 मुलांनी आधाराश्रमात आयुष्याला आकार मिळवू पाहणार्‍या अनाथांसोबत काही क्षण अनुभवले. त्यांच्यासाठी भेटवस्तू आणि खाऊ प्रदान केला. शालेय शिक्षणासोबत याच वयात सामाजिक संस्काराची शिदोरी वाटण्यात सतत अग्रेसर असलेले सुयश क्लासेसचे संचालक पवन जोशी, चंद्रशेखर जोशी, विक्रांत राजगुरू आणि शिक्षकवृंदांच्या सहयोगाने चिमुकल्यांनी राबविलेला हा उपक्रम खरेतर दारूच्या नशेत 31 डिसेंबर साजरा करणार्‍या त्या बेजबाबदार तरूणाईच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणाराच म्हणावा लागेल.