Breaking News

रूपाली मेश्रामची वाघासोबत झुंज वाघाबरोबरील निकराच्या झुंजीत मायलेकी जखमी

नागपूर : वाघ दिसला की अनेकांच्या तोंडचे पाणी पळाल्यासारखी स्थिती होती. पण 21 वर्षीय रुपाली मेश्रामने जीवापाड जपलेल्या शेळ्यांना वाचविताना वाघाशी निकराने झुंज दिली. तर यावेळी लेकीला वाचविताना तिची आईही वाघाच्या हल्ल्यात जखमी झाली आहे. ही थरारक घटना भंडारा जिल्ह्यातील जंगलाशेजारी असलेल्या ऊजगावात घडली आहे.

साकोली तालुक्यातील ऊसगाव येथील रुपालीने आपल्या शिष्यवृत्तीच्या पैशातून शेळ्या खरेदी केल्या आहे. पण 24 मार्चच्या रात्री शेळीने जोराने हंबरडा फोडला. आवाजामुळे रुपाली उठून गोठ्यात गेली, तर तिथे शेळी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. ती जखमी शेळीजवळ गेली, तोच वाघाने तिच्यावर अचानक हल्ला केला. 
या हल्ल्याने जखमी रुपालीच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. पण ती घाबरली नाही, तिने काठीच्या सहाय्याने वाघाला पळवून लावण्याचा प्रयत्न केला. काही काळ तिची वाघाबरोबर झुंज सुरू होती, असे रुपाली सांगते. तेवढ्यात रुपालीच्या आईला मुलीचा आवाज आला. आईने रुपालीला आत ओढले आणि दार बंद केले. त्यामुळे दोघींचाही जीव वाचला.
जखमी अवस्थेतच रुपालीने फोन करून घटनेची माहिती दिली. शेजारील लोकांनी दोघींनाही भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालयात दाखल करण्यात आले. सध्या दोघीही सुखरूप आहेत. रुपालीच्या डोक्याला आणि पाठीला अनेक जखमा झाल्या आहेत. तो क्षण आठवला तर तिच्या डोळ्यात अश्रू येतात. आपल्या मुलीचा जीव वाचल्याचे समाधानही तिच्या आईच्या डोळ्यात दिसून आहे. वाघाच्या हल्ल्यात तिची आईसुद्धा जखमी झाली आहे. पण आजपर्यंत वनविभागाच्या अधिकार्‍यांकडून त्यांना काहीही मदत मिळाली नाही.