Breaking News

तृप्ती देसाईवर शनिदेवाचा कोप ? जामीन अर्ज फेटाळला


राहुरी प्रतिनिधी - सामाजिक कार्यकर्ते विजय मकासरे यांच्या फिर्यादीनुसार भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आणि इतरांविरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी देसाई यांनी जामीन मिळविण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. मात्र उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धर्माधिकारी आणि नाईक यांनी देसाईंसह सर्वांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे तृप्ती देसाईंवर खरोखरच शनिदेवाचा कोप झाला की काय, अशी शंका सध्या व्यक्त केली जाती आहे. 
अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याच्या या गुन्ह्यात देसाईंसह प्रशांत देसाई, सतीश देसाई, कांतीलाल गवारे आणि अन्य यांच्या विरोधात भादंवि कलम ३२३, ३४१, ३९४, ५०६ {३४} यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मकासरे यांनी भूमाता ब्रिगेडच्या रजिस्ट्रेशन आणि संघटनेत सुरू असलेल्या बेकायदेशीर कामाबद्दल विचारणा केली. देसाईंसह सर्वांनी विजय मकासरे यांना मुंबई मंत्रालयात जायचेय, असे सांगून पुण्यात बोलावून घेतले. त्यांनतर मुंबई-बाणेर रस्त्यावर मारहाण करत जीवे मारण्याच्या प्रयत्नासह लूटमार करत जातीवाचक शिवीगाळ केली होती. याप्रकरणी देसाई यांचा पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई हायकोर्ट येथे जामीन अर्ज दाखल केला. दरम्यान, देसाई यांनी, ही फिर्याद खोटी असून सदर फिर्यादी विजय मकासरे हे ख्रिश्चन आहेत. ते अनुसूचित जातीजमाती कायद्यामध्ये येत नाहीत. त्यामुळे जामीन मिळावा, असे कोर्टाला सांगितले. सरकारी वकील श्रीमती म्हात्रे आणि अँड. शंतनू फणसे यांनी गुन्हा घडलेल्या ठिकाणी सर्व आरोपींचे मोबाईल लोकेशन व फिर्यादी यांचे मोबाइल लोकेशन घटनास्थळी आढळून आल्याचे कोर्टाच्या निदर्शनात आणून देत सदरचा गुन्हा घडला असून फिर्याद खोटी नसल्याचेही स्पष्ट केले. दरम्यान, विजय मकासरे यांचे जात प्रमाणपत्र सादर करून मकासरे हे अनुसूचित जाती जमातीमध्ये येत असल्याचे सांगितले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने देसाई यांचा जामीन अर्ज फेटाळला.