Breaking News

‘पितापुत्रा’च्या भेटीने पोलीस ; एसटी प्रशासनाने सोडला निःश्वास


राहुरी वि. प्रतिनिधी - येथील बसस्थानकावर बारामती-धुळे या बसमध्ये ३ ते ४ वर्षांचा मुलगा वडिलांचा हात सुटल्याने अचानक बेपत्ता झाला. आज {दि. ३०} दुपारी ही घटना घडली. त्यामुळे पोलिस आणि बसस्थानक प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. बसस्थानक प्रमुख विलास गोसावी आणि पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून दोन तासांत या मुलाच्या वडिलांना शोधून काढले. बेपत्ता झालेल्या मुलाची आणि वडिलांची भेट झाल्याने पोलिस निरीक्षक आणि बसस्थानक प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला.

हे पितापुत्र बारामती-धुळे या एसटी बसने मालेगाव येथे जात होते. एसटी बसमध्ये वडिलांपासून हा मुलगा बेपत्ता झाला. या मुलाचे वडील चुकून दुसर्या बसने शिर्डी येथे गेले आणि मुलगा राहुरी बसस्थानकावरच राहिला. वडील दिसत नसल्याने तो काहीसा गांगरुन गेला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ हे सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. तो रडत होता. वाघ यांनी त्या मुलाला मोडकी तोडकी अयराणी भाषा बोलत शांत केले. किसन गणपत सोनवणे {रा. पिंपळगाव, ता. मालेगांव} असे त्याचे नाव असल्याचे समजले. दरम्यान, त्या बालकाच्या वडिलांचा तपास लागताच उपस्थित सर्वांनीच सुटकेचा सुस्कारा सोडला. हरवलेला मुलाला मिळाल्याने सापडल्याने त्याच्या वडिलाला भावना अनावर झाल्या. यावेळी पोलिस नाईक शिवाजी खरात, महिला पोलिस राधिका कोहकडे, चालक बोडखे आदींनी एकमेकांपासून हरवलेल्या पितापुत्राच्या शोधकार्यासाठी पुढाकार घेतला.