मुलींनी कुस्तीत देशाचा नावलौकिक वाढवावा - नंदिनीदेवी मोहिते
सोलापूर, दि. 07, मे - महिलांना कोणतेही क्षेत्र वर्जित नाही. अबला आहेत या विचारास मूठमाती देत व कुस्तीत आपले गाव, देशाचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन कृषिभूषण नंदिनीदेवी मोहिते यांनी केले. अकलूज येथे ताराराणी महिला कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उन्हाळी प्रशिक्षण व चाचणी शिबिराचे उद्घाटना प्रसंगी त्या बोलत होत्या.
नंदिनीदेवी म्हणाल्या, आजची विषम सामाजिक परिस्थिती पाहता महिला, मुलींनी शारीरिकदृष्ट्या सक्षम व्हायलाच पाहिजे. झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या बहाद्दुरीचे गोडवे खुद्द इंग्रजांनीही गायले आहेत. त्याप्रमाणे मुलींनी स्वतःला सिद्ध करून आपले अस्तित्व जगासमोर आणले पाहिजे. कुस्ती म्हणजे शक्ती आणि भक्तीचा सुरेख संगम असतो. कुस्तीत पुरुष वर्गाची असलेली मक्तेदारी महिला मोडीत काढत आहेत. ताराराणी महिला कुस्ती केंद्रात सहभागी होणार्या मुली आपले आपल्या आईवडिलांचे आणि गावाचे नाव उंचीवर नेतील, अशी अपेक्षा नंदिनीदेवी यांनी व्यक्त केली. प्रशिक्षण केंद्राच्या अध्यक्ष शीतलदेवी मोहिते म्हणाल्या, इतर राज्याच्या तुलनेत आपल्याकडे महिलांच्या कुस्तीसंदर्भात उदासीनता दिसून येत आहे.