Breaking News

येसवडी कुकडी चारी पाणी प्रश्‍नावर शेतकर्‍यांचे विखेंना साकडे


कुळधरण : कर्जत तालुक्यातील येसवडी कुकडी चारीला नियमित आवर्तन पोहोचत नसल्याने या भागातील शेतकर्‍यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. पालकमंत्री राम शिंदे हे गेली दहा वर्ष तालुक्याचे नेतृत्व करीत असुनही त्यांना येथील शेतकर्‍यांना न्याय देता आलेला नाही. शेतकर्‍यांनी अनेकदा भेटुन आपले गार्‍हाणे पालकमंत्री शिंदे यांचेकडे मांडुनही परिस्थिती जैसे थे राहिली. अखेर या भागातील शेतकर्‍यांनी अखेर या प्रश्‍नावर विरोधीपक्ष नेते यांच्याकडे प्रश्‍न सोडविण्याची मागणी केली आहे. मंगळवारी राशिन येथे डॉ.सुजय विखे पाटील यांची भेट घेवुन निवेदन देण्यात आले.

येसवडी चारीवरील कुळधरण, धालवडी, तळवडी बारडगाव, येसवडी, धुमकाई फाटा, करमनवाडी या भागात कुकडीचे नियमित व पुरेसे आवर्तन मिळत नाही. त्यामुळे या भागातील ऊस तसेच इतर पिके उन्हाळ्यात जळुन खाक होतात. पाण्याअभावी पिके जळत असल्याने या भागातील शेतकर्‍यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. या भागातील हा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्‍न असल्याने शेतकर्‍यांमध्ये असंतोष आहे. कुळधरण ग्रामविकास संघटनेच्या पुढाकारातुन या प्रश्‍नावर ऑक्टोबर 2017 मध्ये येसवडी कुकडी चारी संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. समितीच्या वतीने निवेदने, आंदोलने करण्यात आली. दरम्यान समिती सदस्यांनी पालकमंत्री शिंदे यांची भेट घेवुन पाण्याची समस्या मांडली.गेल्या आवर्तनाचे पाणी न पोहोचल्याने समितीने विविध मार्गाने प्रयत्न सुरुच ठेवले. सत्ताधार्‍यांकडुन न्याय मिळत नसल्याने अखेर शेतकर्‍यांनी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन सुपुर्द केले आहे. मंगळवारी धालवडीचे माजी सरपंच बापुराव सुपेकर, सोसायटीचे चेअरमन मोहन सुपेकर, बंडु सुपेकर, शशिकांत लिहिणे, बंटीराजे जगताप, अरुण तांबे, दत्तात्रय पवार, लालासाहेब खोडवे, गणपत तांबे, सुनील शितोळे, वामन शितोळे, शरद तांबे, सतीश खोडवे आदींनी सह्यांचे निवेदन करुन विखे यांना या प्रश्‍नी लक्ष घालण्याचे साकडे घातले.

येसवडी चारीवर पाण्यासाठी राजकीय हस्तक्षेप होत आहे. कुळधरण गटातील सत्ताधारी व विरोधक यांच्या संगणमताने जाणूनबुजून पाणी पोहोचु दिले जात नाही. तुम्ही आम्हाला मतदान करित नाही असेही पक्षाचे नेते बोलुन दाखवत असुन, राजकीय हस्तक्षेप न होता हक्काचे पाणी मिळावे अशी मागणी निवेदनातुन करण्यात आली आहे. पालकमंत्री पाण्याचे आश्‍वासन देतात, मात्र कुळधरण भागातच चार्‍यांची अनधिकृतपणे तोडफोड करुन पाणी घेतले जाते. त्यामुळेच टेलच्या करमनवाडी भागात पाणी पोहोचत नसल्याचे स्पष्ट करुन ठरवून दिलेले हक्काचे पाणी मिळविण्यासाठी प्रयत्न होण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.


येसवडी चारीवर कुळधरण गटाचे राजकारण

येसवडी चारीच्या पाण्यावर कुळधरण जिल्हा परिषद गटातील सात-आठ गावे अवलंबून आहेत. कुकडीचे पाणी या भागात आणले असा प्रचार करुन भाजपाचे राम शिंदे निवडुन आले. जिल्हा परिषदेत गुंड गटाचे पारंपरिक वर्चस्व आहे. आता आपली सत्ता आहे असे म्हणत शिंदे यांच्या नावाचा वापर भाजपाकडुन होतो. कुकडीचे पाणी येताच आपल्याच शेतातील बंधारे भरण्यात गावपुढारी गुंततात. पाण्याचा अपव्यय हे टेलला पाणी न पोहोचण्याचे कारण आहे. अधिकारी सत्ताधार्‍यांच्या मर्जीने वागत समान पाणी वाटप होत नसल्याची शेतकर्‍यांची तक्रार आहे. माजी जि.प. सदस्य राजेंद्र गुंड हे शेतकर्‍यांचे कोणतेही प्रश्‍न असले तरी स्वतः जातीने हजर राहतात. त्यांच्या उपस्थितीच्या समाधानात अनेक शेतकरी व कार्यकर्ते प्रश्‍न विसरुन जातात हे वास्तव आहे. त्यांनी दिलेला शाब्दिक दिलासा प्रमाण मानण्याची या भागात परंपरा आहे. अनेक आंदोलने बारगळुन टाकण्यात व शेतकर्‍यांचे संघटन मोडीत काढण्यात येथील काही नेतेमंडळी यशस्वी होतात. त्यामुळे शेतकर्‍यांनी आता राजकारणात यशस्वी असलेल्या विखे पॅटर्नची वाट धरली आहे.त्यांच्यामार्फत हा प्रश्‍न मार्गी लागल्यास या भागातील राजकारण बदलुन जाण्याची शक्यता आहे.