Breaking News

उपचाराअभावी जखमी हरिणाने घेतला अखेरचा श्‍वास


पारनेर : तालुक्यातील विरोली येथील गणपती पठार येथे जखमी हरणास वेळेत उपचार न मिळाल्याने अखेर जीव गमवावा लागला, त्यामुळे ग्रामस्थ व वन्यप्राणी प्रेमीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, विरोली येथील गणपती पठार सावकार भाऊसाहेब भागवत यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाखाली जखमी अवस्थेत नर जातीचे हरिण सावकार भागवत व पंढरीनाथ त्रिंबक भागवत यांना दिसून आले. त्याच्या गळ्यावर मानेवर जंगली प्राण्याने चावा घेतल्याच्या जखमा खोलवर होत्या, म्हणुन त्यांनी तातडीने प्राणी मित्र पत्रकार संजय मोरे यांना भ्रमणध्वनीवरून माहिती कळविली, मोरे यांनी वन विभागाच्या कर्मचार्‍यांना याविषयी देऊनही तब्बल दोन तासांनी वन कर्मचारी घटनास्थळी पोहचले, मात्र कोणतेच प्रथम उपचार साहित्य अथवा पशुवैयकिय अधिकारी सोबत न आणता! जर जखमी हरणास वेळेत उपचार भेटले असते तर, त्याचा जीव वाचला असता, मात्र त्यानंतर पशुवैद्यकिय अधिकार्‍याने जागेवरच शव विच्छेदन करून अंत्यविधी करण्यात आला.

वन विभागाची यंत्रणा रामभरोसे...एखादा वन्यप्राणी जखमी झाला तर त्याला तातडीने उपचार मिळण्याची यंत्रणा पारनेर तालुक्यात सुस्त आहे. उन्हाची तीव्रता वाढत असताना पाणीटंचाईच्या झळा वन्य प्राण्यांना बसत आहेत. त्यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीकडे धाव घेतात, विरोली परिसरात मोठ्या प्रमाणावर हरिण, मोर, बिबट्या यासारख्या प्राण्यांचा वावर आहे. वनविभागाचा वतीने प्राण्यांच्या पिण्याचा पाण्याची सोय करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. वनविभागाच्या हलगर्जीपणाबद्दल ग्रामस्थांनी निषेध व्यक्त केला.