Breaking News

मध्य प्रदेशमधील तरुणांना रोजगार देण्याची जबाबदारी पुण्याच्या ’यशस्वी’ संस्थेकडे


पुणे, दि. 12, मे - मध्य प्रदेशमधील बेरोजगार युवकांना समुपदेशन व योग्य मार्गदर्शनाद्वारे खासगी क्षेत्रातील विविध नोकर्‍याची संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पीपीपी तत्वानुसार पुणे येथील कौशल्य विकास व रोजगार क्षेत्रातील अग्रगण्य ’यशस्वी’ या संस्थेस देण्यात आली असून मध्य प्रदेशमधील 51 जिल्ह्यातील सुमारे एक लाख बेरोजगारांना प्रति वर्षी रोजगार देण्याची जबाबदारी ’यशस्वी’ संस्थेला देण्यात आली आहे. यासंदर्भातील सामंजस्य करार मध्य प्रदेशचे तंत्रशिक्षण, कौशल्य विकास व रोजगार मंत्री दीपक जोशी, मध्यप्रदेश सरकारच्या कौशल्य विकास व रोजगार निर्माण मंडळाचे अध्यक्ष हेमंत देशमुख, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव व तंत्र शिक्षण व रोजगार विभागाचे प्रमुख अशोक वर्णवाल व मध्य प्रदेश रोजगार निर्माण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखवीर सिंह आदींच्या प्रमुख उपस्थितीत भोपाळ येथे करण्यात आला.

रोजगार विभागाचे संचालक संजीव सिंह व ’यशस्वी’ संस्थेचे अध्यक्ष विश्‍वेश कुलकर्णी यांनी या करारावर स्वाक्षरी केली. केंद्र सरकारच्या धोरणाची अंमलबजावणी करून अशा स्वरूपाचा करार क रणारे मध्य प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. भोपाळ,इंदौर, जबलपूर, रीवा, ग्वाल्हेर, सागरउज्जैन, होशंगाबाद, शहडोल,धार, खरगौन,देवास,सिंगरौली,सतना व कटनी या पंधरा जिल्ह्यात हे रोजगार केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत या 15 जिल्ह्यांमधील औद्योगिक विकास अधिक असल्याने या जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे असे मध्यप्रदेशचे कौशल्य विकास व रोजगार मंत्री दीपक जोशी यांनी सांगितले.