Breaking News

पंतप्रधानपदाला खालच्या थराची भाषा शोभत नाही डॉ. मनमोहन सिंग यांची पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका

बंगळुरू/वृत्तसंस्था: पंतप्रधान पदावरील व्यक्तीने निवडणूक प्रचारादरम्यान अशी भाषा वापरणे चूकीचे आहे. यापूर्वी देशातील कोणत्याही पंतप्रधानांनी इतक्या खालच्या थराला जाऊ न टीका केली नव्हती. पंतप्रधानांनी यातून बोध घ्यावा आणि समाजात दुही माजविण्याचा प्रयत्न करणे थांबवावे, असे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी बंगळुरूमध्ये आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी जीएसटी, केंद्र सरकारची आर्थिक धोरणे, नीरव मोदीचा भ्रष्टाचार यावरून सिंग यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले. पीएनबी घोटाळ्यावरून मनमोहन सिंग यांनी प्रश्‍न उपस्थित केले. 2015-16 च्या दरम्यान काहीतरी गडबड सुरू होती. त्यावेळी सरकारने काही के ले नाही. त्यामुळे जबाबदार ठरवायचे असेल तर त्यावेळी सरकारने घेतलेल्या भूमिकेला ठरवायला हवे, असे मनमोहन सिंग म्हणाले. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत हिरे व्यापारी नीरव मोदी दावोसला होता. त्यानंतर काही दिवसांमध्येच त्याने पळ काढला. यावरून सरकारची निष्क्रियता दिसून येत असल्याची टीका मनमोहन सिंग यांनी केली. गेल्या चार वर्षात पंतप्रधान मोदी यांनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. यातून एकप्रकारे त्यांच्या कामाची पध्दत दिसून येत असल्याचा आरोप, मनमोहन सिंग यांनी केला.