मुंबई - प्रसिद्ध भावगीत गायक अरुण दाते यांचे आज निधन झाले. रविवारी सकाळी 6 वाजता कांजूरमार्ग येथील निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली. ते 84 वर्षांचे होते.सायन येथील स्मशानभूमीत रविवारी 12 ते 4 या कालावधीत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. नुकताच 4 मेला त्यांनी 84 वा वाढदिवस साजरा केला होता. त्यांच्या जाण्याने संगीत विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ’शुक्रतारा मंदवारा’, ’भातुकलीच्या खेळामधले राजा आणि राणी’ यासारखी त्यांची अनेक गाणी रसिकांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवत आहेत. अरुण दाते यांचा जन्म 4 मे 1934 मध्ये झाला. त्यांचे वडील रामूभैय्या दाते इंदूरमधील प्रतिष्ठित गायक होते. वडिलांच्या इच्छेनुसार त्यांनी गायन क्षेत्र निवडले होते. त्यांनी इंदूरमधील धारमध्ये कुमार गंधर्वांकडे सुरुवातीला गायनाचे धडे घेतले. त्यांनतरचे पुढील शिक्षण त्यांनी के. महावीर यांच्याकडे घेतले. त्यानंतर 1955 पासून त्यांनी आकाशवाणीवर गायला सुरुवात केली. ‘शुक्रतारा मंदवारा’ या गाण्याने दाते यांना लौकीक मिळवून दिला. अरुण दाते यांनी शुक्रतारा या मराठी भावगीत कार्यक्रमाचे अडीच हजाराहून अधिक कार्यक्रम केले. मराठी सोबतच उर्दूतही त्यांनी आपला ठसा उमटविलेला आहे. मराठी-उर्दू गीतांचे त्यांचे पंधराहून अधिक अल्बम प्रसिद्ध आहेत. टेक्स्टाईल इंजिनिअर म्हणून नोकरी केल्यानंतर त्यांनी संगीत क्षेत्रात स्वत:ला वाहून घेतले. त्यांचे ’शतदा प्रेम करावे’ हे आत्मचरित्र प्रकाशित झालेले आहे.
रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे गायक
‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ’शुक्रतारा मंदवारा’, ’भातुकलीच्या खेळामधले राजा आणि राणी’ यासारखी त्यांची अनेक गाणी रसिकांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवत आहेत.अरुण दाते यांनी शुक्रतारा या मराठी भावगीत कार्यक्रमाचे अडीच हजाराहून अधिक कार्यक्रम केले. मराठी सोबतच उर्दूतही त्यांनी आपला ठसा उमटविलेला आहे. मराठी-उर्दू गीतांचे त्यांचे पंधराहून अधिक अल्बम प्रसिद्ध आहेत.