Breaking News

समृद्धी महामार्गबाधित शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावू : खा. लोखंडे


कोपरगाव ता. प्रतिनिधी - समृद्धी महामार्गातील शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाबाबत सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांचे समवेत येत्या मंगळवारी {दि. १५ } बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू, असे ठोस आश्वासन खा. सदाशिव लोखंडे यांनी उपोषणकर्त्यांना दिले. या आश्वसनामुळे सदरचे उपोषण मागे घेण्यात आले.

कोपरगाव तालुक्यातील मौजे भोजडे, कान्हेगाव, कोकमठाण, देर्डे या गावातील समृद्धी महामार्गात बाधित असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात एम. आय. डी. सी. चे अधिकारी आणि शेतकरी यांची महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली होती. त्यात प्रामुख्याने कान्हेगाव येथील शेतकऱ्यांना मिळालेल्या जमिनी या खंडाच्या सुटलेल्या आहेत. खंडकरी म्हणून एका युनिटला सिलिंग ऍक्ट प्रमाणे सदर जमीन बागायती म्हणून १८ एकरपर्यंतच देण्यात आलेली आहे. आता मात्र शासन समृद्धी महामार्गासाठी ती जमीन खरेदी करताना हंगामी बागायतीचा दर देत आहे. तो शेतकऱ्यांना मान्य नाही. जर सदर जमिनी शासनाने बागायती म्हणून सोडल्या आहेत. त्यामुळे आताही खरेदी करताना बागायतीच दर द्यावा, अशी मागणी वेळोवेळी शासनाकडे करण्यात आलेली आहे. या संदर्भातील सर्व पुरावे प्रांताधिकारी शिर्डी यांच्याकडे दिलेले आहेत. तसेच मौजे भोजडे येथील प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना गोदावरी डाव्या कालव्याच्या माध्यमातून आठ माही पाणी मिळते. त्यामुळे संबंधित जमिनीचे हंगामी बागायत धरून मूल्यांकन करावे, अशी मागणी केली आहे. याबाबत मंत्रालयातील बैठकीत सकारात्मक निर्णय झालेला असताना मात्र उपविभागीय अधिकारी शिर्डी त्याबाबत कोणतीही कारवाई करत नाही. दरम्यान या आणि विविध मागण्यांसाठी कोपरगाव तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले.

उपोषणस्थळी खा. लोखंडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, राजेंद्र झावरे, तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे, नायब तहसिलदार सुसरे आदींनी भेट दिली. यावेळी रावसाहेब थोरात, सुरेश गिरे, अस्लम शेख, संजय दंडवते, विक्रम सिनगर, माधवराव चौधरी, भारत भाकरे, ज्ञानेश्वर भाकरे, सुनिल काजळे, अप्पासाहेब डुकरे, संजय चौधरी, फारुख पटेल, युनिस पटेल, दत्तात्रय सिनगर, पोपटराव डुबे, बाळासाहेब भाकरे, अजित सिनगर आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.