Breaking News

मुळा धरणाची सुरक्षा ठरतेय औटघटकेची! संरक्षणासाठी दोनच कर्मचारी


राहुरी विशेष प्रतिनिधी - मुळाधरणाच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाने दाखविलेली सतर्कता निव्वळ औटघटकेची ठरल्याची चिन्हे आहेत. मुळा धरण स्थळावर प्रत्यक्ष पाहणी केली असता धरणाच्या संरक्षणाची जबाबदारी केवळ पाटबंधारे विभागाच्या दोन कर्मचार्‍यांवर सोपविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 

जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा धरण भागात विषारी औषधासह जिलेटीनने मासेमारी होत असल्याचा प्रकार मध्यंतरी उघड झाला होता. त्यामुळे प्रशासनामध्ये चांगलीच खळबळ उडाडी होती. तत्पूर्वी ठेकेदारांकडून पाचजणांना या धरणात विषारी औषधयुक्त भात टाकताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. औषधाच्या बाटलीसह अवैध मच्छिमार करणार्‍यांना पोलिस ठाण्यात आणून ठेकेदाराकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, पाटबंधारे विभागाने असा प्रकार मुळा धरण परिसरात होत नसल्याचे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला होता. 

मुळा धरणस्थळी केवळ ठेकेदारांचे काही कर्मचारी व पाटबंधारे विभागाचे दोनच कर्मचारी यांच्या व्यतिरीक्त इतर कोणीही आढळून आले नाही. अधिकारी कामानिमित्त बाहेरगावी असल्याचे सांगण्यात आले. तर बंदूकधारी ३ पोलिस चौकीवर थांबविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. 

उपअभियंता बुधवंत यांची चौकशी करा 

मुळा धरणावरून वाळूची शेकडो वाहने जाऊ देण्यासाठी पुढाकार कोणी घेतला, अधिकारी व कर्मचारी किती वेळा कामावर हजर राहिले, सीसीटिव्हीचे फुटेज का बंद ठेवले, धरणाचे अनेक रस्ते उघडे असताना शासनाला का सांगण्यात आले नाही, भंगार विक्रीचे टेंडर का प्रकाशित केले नाही, धरणावरील अनेक पथदिवे बंद असताना पाटबंधारे विभाग शांत का, असे अनेक प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. पाटबंधारे विभाग स्वतः चा भोंगळा कारभार लपविण्यासाठी मुळानगर ग्रामस्थांना अतिक्रमण हटविण्याची नोटिसा देऊन वेठीस धरत आहे. या पार्श्वभूमीवर उपअभियंता शामराव बुधवंत यांची चौकशी करावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.