Breaking News

आदिवासी महिलेच्या कुटुंबाला संपविण्याची धमकी महिलेने घेतली डिएसपी कार्यालयात धाव


अहमदनगर / प्रतिनिधी  - नेवासे तालुक्यातील सोनईलगतच्या लोहगावरोड परिसरात एक आदिवासी महिला कुटुंबासमवेत राहत आहेत. मात्र सदर महिला आणि तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्याचा धक्कादायक प्रकार गेल्या तीन महिन्यांपासून सुरु आहे. या परिसरातील बागायतदार शेतकरी ही धमकी देत असल्याची तक्रार लीलाबाई भाऊसाहेब पवार या आदिवासी महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदनाद्वारे दिली. 

लोहगाव रोड परिसरातील पाटाजवळील लाटे वस्तीनजिक कुटुंबासमवेत राहत असलेल्या लीलाबाई पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, या भागातील सोमनाथ आश्रुबा कोकाटे, नंदा सोमनाथ कोकाटे, सिद्धार्थ तुकाराम गडाख, बबलू कोकाटे, अशोक कोकाटे, भाऊराव कोकाटे आदींनी पवार यांच्या मुलाला छेडछाडीच्या खोट्या गुन्ह्यात अडकविले. पवार यांचा मुलगा मुळा कारखान्यात रोजंदारीवर कामावर होता. मात्र त्याचे काम काढून घेऊन स्वतःला काम मिळावे, यासाठी या लोकांनी छेडछाडीचे खोटे कुभांड रचल्याचे लीलाबाई पवार यांचे म्हणणे आहे. या लोकांनी आम्ही या भागात राहू नये, यासाठी आमच्या घरावर दगडफेक करणे, रात्रीअपरात्री दारू पिऊन अर्वाच्च शिवीगाळ करणे आणि आम्ही येथून निघून जावे, यासाठी आमच्या संपूर्ण कुटुंबाला संपविण्याची धमकी देण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. यासंदर्भात पवार यांनी दि. ८ मार्च रोजी सोनई पोलिसांना तक्रार दिली होती. मात्र पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नाही. त्यामुळे नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिले. या लोकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सदर निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.