पावणेतीन कोटींचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मंजूर
जामखेड : स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत जामखेड शहराच्या स्वच्छतेसाठी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नाने पावणेतीन कोटींच्या नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे जामखेड शहर कचरामुक्त शहर होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरु झाली आहे.
देशातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण आणि चांगली आरोग्य मिळावे, यासाठी केंद्रातर्फे स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. केंद्राच्याच धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुरु आहे. या अभियानांतर्गत शहरे हागणदारीमुक्त करणे आणि घनकचरा व्यवस्थापनांतर्गत स्वच्छ करणे यास प्राधान्य आहे. यामध्ये समाविष्ट करून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास जामखेड येथे मान्यता मिळावी, यासाठी नगर पालिकेने प्रस्ताव पाठविला होता. यासाठी नगराध्यक्षा अर्चना सोमनाथ राळेभात व उपनगराध्यक्ष महेश निमोणकर व नगरसेवकांनी पाठपुरावा सुरु ठेवला होता. अखेर या पाठपुराव्यास यश येऊन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नाने जामखेड शहरासाठी २ कोटी ६९ लाख १७ हजार किंमतीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी शासनाची मान्यता मिळाली आहे.
जामखेड शहराचा घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे देखील जामखेडच्या प्रकल्प मागणीचा विचार प्राधान्याने करण्यात आला. स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत जामखेड करांसाठीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अहवालास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मान्यता देऊन ‘निरी’ या संस्थेने या प्रकल्पांचे मूल्यांकन केल्यानंतर शासनाने सदर प्रस्तावास मान्यता दिली आहे. या प्रकल्पाचा निम्मा खर्च केंद्र सरकार तर निम्मा खर्च राज्य सरकार करणार आहे. प्रकल्पास मान्यता दिल्याबद्दल नगराध्यक्षा अर्चना सोमनाथ राळेभात यांनी पालकमंत्री प्रा. राम शिंदे तसेच राज्य शासनाचे आणि साथ देणारे सर्व नगर परिषद सदस्य, मुख्याधिकारी यांचे अभार मानले.