Breaking News

दर न मिळाल्यास सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा दुग्ध उत्पादक कृती समितीचा इशारा


पुणे, दि. 12, मे - दुग्ध उत्पादन करणा-या शेतक-यांच्या आंदोलनानंतर महाराष्ट्र सरकारने दुधाचा खरेदी दर प्रती लीटर 27रुपये केला असून सहकारी संघाना त्याबाबत सक्ती केली आणि नोटीसा दिल्या आहेत. परंतु शासनाने निर्धारित केलेला दर दूध उत्पादकांना देणे शक्य नसल्याचे दूध व्यावसायिकांतर्फे सांगण्यात आले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून दूध महासंघाच्या अडचणी त्यांच्यासमोर मांडण्यात येणार आहेत. 

त्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी काही ठोस निर्णय न घेतल्यास सरकार विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक कृती समितीने दिला आहे. पुण्यातील कात्रज डेअरी येथे दुग्ध व्यावसायिकांच्या दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाची सभा झाली. राज्य शासन दूध खरेदी दराबाबत करीत असलेली सक्ती व इतर राज्यात दूध खरेदीसाठी दिले जाणारे अनुदान या अनुषंगाने शासनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.