Breaking News

सत्कार समारंभाचे पैसे प्राथमिक शाळेसाठी देण्याचा संकल्प

ने

नेवासाफाटा - ध्येय प्रेरित स्मार्टग्राम नजीक चिंचोली गांवाने सत्कार समारंभाचे पैसे गांवचे भविष्य घड़वीणार्‍या प्राथमिक शाळेसाठी देण्याचा संकल्प केल्याची माहिती नजिक चिंचोलीचे सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पाठक यांनी दिली . सध्या लग्नसराईचा महोत्सव जागोजागी साजरा होतांना दिसतो आहे. वर्‍हाडी मंडळी उन्हाच्या झळा, तर वधू वर पक्षाची मंडळी आर्थिक झळा सोसतांना दिसत आहेत. वधू - वर पक्ष आपल्या लग्नासाठी आलेल्या राजकिय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व इतर विविध क्षेत्रातील मान्यवरांचा हारतुरे, शाली, गुलाबपुष्पे ,फेटे सारख्या क्षणभंगूर गोष्टी देवून सत्कार करतांना जागोजागी दिसत आहेत.काही मंडळी तर सत्काराच्या खर्चाला फाटा देवून धर्मस्थळे, देवस्थाने यांना दानधर्म करीत आहेत.

पण समाजासमोर एक आगळावेगळा आदर्श घालून देण्यासाठी नेवासे तालुक्यातील ध्येयप्रेरित स्मार्टग्राम नजीक चिंचोलीने मात्र गावातील लग्नातील होणारा सत्काराचा खर्च गावाचे भविष्य घडविणा-या प्राथमिक शाळेसाठी देण्याची परंपरा सुरू केली असून दरवर्षी हजारो रूपयांचा सत्कार निधी शाळेकडे जमा होत आहे. या वर्षीही नजीक चिंचोलीचे नवनियूक्त तहसिलदार सुपूत्र अमोल भागचंद पाठक यांनी स्वत:च्या लग्नातील सत्कार खर्चाऐवजी चार हजार एवढा निधी, शाळेचे मुख्याध्यापक राधाकिसन वाघमारे यांनी मुलाच्या लग्नामध्ये सत्काराऐवजी अकरा हजार एवढा निधी शाळेकडे सुपूर्द केला आहे. उभयतांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. गावातील शाळेलाच सर्व ठिकाणी होणार्‍या सत्काराचे पैसे समाजातील दानशूरांनी द्यावेत असे मत नजीक चिंचोलीचे सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पाठक यांनी मांडले.