Breaking News

लग्नसराईच्या काळातच पोलिसांनी रोखला बालविवाह.



जामखेड: लग्नसराईची मोठी धामधूम सुरू आहे. या धामधुमीत जामखेड तालुक्यातील पोतेवाडी येथील अल्पवयीन मुलीचा त्रिमूर्ती मंगल कार्यालयात होणारा बालविवाह रोखण्यात पोलीसांना यश आले आहे.पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अहमदनगर चाईल्ड लाईन कडे जामखेड शहरातील त्रिमूर्ती मंगल कार्यालयात 2 मे रोजी तालुक्यातील पोतेवाडी येथील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न लावले जात असता, चाईल्ड लाईने चौकशी करून जामखेड पोलिस स्टेशनला व गटविकास अधिकारी यांना संबंधित मुलीचा बालविवाह रोखण्यासाठी पत्र पाठवले. सदर गंभीर प्रकरणाची माहिती महिला पोलीस काँस्टेबल शबनम शेख यांनी पोलीस निरीक्षक पांडूरंग पवार यांना दिली. 


पोलीस निरीक्षक पांडूरंग पवार यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन महिला पो.काँ. शबनम शेख, पो.काँ. कुरेशी, पो.काँ. सपट, पो.काँ. अल्ताफ शेख, पो.हे.कॉ. बापुसाहेब गव्हाणे, पो.काँ. राहुल हिंगसे यांचे टिमने त्रिमूर्ती मंगल कार्यालयात जाऊन, या टिमने प्रसंगावधान राखून तात्काळ वधु-वरांस ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले. पोलिसांनी दोन्ही परिवाराच्या प्रमुखांशी हा बालविवाह असून तो तुम्ही करू शकत नाही हे समजावून सांगितले.

पोलीसांनी कायदेशीर बाबी लक्षात आणून दिल्याने दोन्ही बाजूच्या नातेवाईकांनी लग्न न लावण्याचे मान्य केले.
जामखेड शहरातील सर्व मंगल कार्यालयांना लग्नांचे रजिस्टर ठेवणं बंधनकारक आहे तरी, बालविवाहाबाबत पोलिसांना माहिती देणेही बंधनकारक आहे, तसे न केल्यास मंगल कार्यालयावर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.