दुचाकीस्वारांना चिरडण्याचा वाळू तस्करांचा प्रयत्न
राहुरी शहरातील तनपुरेवाडी रस्त्यावर दुचाकीस्वारांना वाळूच्या वाहनाखाली दुचाकीस्वारांना चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. काल {दि. ९ } रात्री घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमधे भितीचे वातावरण पसरले आहे.
शहरातील तनपुरेवाडी परिसरातील मुळानदी पात्रातून रात्रीच्या दरम्यान टेंपो आणि तीन चाकी रिक्षाच्या साहाय्याने वाळू तस्करी मोठ्या जोमान सुरु आहे. महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या कारवाईला न जुमानता वाळू तस्कर प्रचंड शिरजोर झाले आहेत. रात्रीबेरात्री या रस्त्याने येणारया नागरिकांना या तस्कराच्या सुसाट वेगाने येणारया वाहनांचा सामना करावा लागत आहे. काही बोलल्यास वाळू तस्कर दमबाजी करत दहशत पसरवत आहेत. त्यामुळे नागरिकांमधे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल {दि. ९} रोजी रात्री बाराच्या सुमारास शहरातील दोघे तरुण दुचाकीवर तनपुरेवाडी भागाकेड जात होते. समोरुन वाळूने भरलेल्या येत असलेल्या टेंपोने या दुचाकीस्वारांना जोराची धडक दिली. यावेळी मोठा आवाज झाल्याने आजूबाजूचे नागरिक जागे झाले. या धडकेने दुचाकीस्वार तरुण बेशुध्द पडले. यातील सागर नावाचा तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याठिकाणी वाळू वाहतूक करणारया वाहनाच्या मालकाने येऊन सदर प्रकरण मिटवामिटवी करण्याचा प्रयत्न केला. स्थानिक नागरिकांनी या वाळूतस्करावर चांगलेच तोंडसुख घेतले. मात्र या वाळूतस्कराने या नागरिक व महिलांवर दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. चौकट
नगरसेवकाची प्रशासनाकडे तक्रार
तनपुरेवाडीरोडलगत भंगार दुकानासमोर कायम रस्त्यावर भंगाराचे साहित्य विखुरलेले असते. त्यामुळे या रस्त्याने ये-जा करण्यासाठी वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी या भागातील नगरसेवकाने पालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती. यावेळी पालिकेने रस्त्याला अडथळा होत असलेले साहित्य जप्त केले होते.