Breaking News

‘टँकरमुक्त गावे’ प्रक्रियेची साडेसाती संपेना!


कोपरगाव : ग्रामीण आणि शहरी भाग टँकरमुक्त करण्याच्या घोषणा गतकाळात सरकारने केल्या. त्यासाठी तशा योजनाही राबविल्या गेल्या. मात्र प्रशासनाला आलेली मरगळ, आर्थिक अडचणी आणि अपुऱ्या निधीचे सोंग करत या योजना केवळ दिखावा ठरत आहेत. दुसरीकडे अनेक गावे मात्र तहानेने व्याकूळ झालेली आहेत. यासाठीच्या योजना असून अडचण नसून खोळंबा झाल्या आहेत. अशा परिस्थितीत गावे टँकरमुक्त होण्याच्या प्रक्रियेची साडेसाती मात्र काही केल्या संपायला तयार नाही. 
तालुक्यातील रांजणगाव देशमुख, अंजनापूर, वेस, सोयगाव, धोंडेवाडी, अंजनापूर, मनेगांव या गावांसोबतच पूर्व भागातील उक्कडगाव आदी गावांच्या नशीबी दरवर्षीप्रमाणे एप्रिल आणि मे या दोन महिन्यांतील पाण्यासाठीची भटकंती संपण्याचे नाव घ्यायला तयार नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेतून सहा गावांसाठी उजव्या कालव्यावरुन धोंडेवाडी साठवण तलावाची निर्मिती झाली. या तलावात पाण्याची साठवण झाल्यास सहा गावांची तहान भागते. मात्र सध्या या योजनेवरील ३० लाख रुपयांचे वीजबिल थकल्यामुळे कालव्याला आवर्तन येऊनही साठवण तलाव भरता आला नाही. त्यामुळे रांजणगाव देशमुखला आजपासून टँकर सुरु करावा लागला. तर अंजनापूर, धोंडेवाडी टँकरच्या प्रतिक्षेत आहे. अजून दोन महिने पाण्याचा सामना करावा लागणार असल्याने उर्वरित तीन गावांनाही अल्पावधीतच मागणी करावी लागणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने योजनेचा मोठा धोंडा उचलला असला तरी निधीअभावी तळ्यात पाणी येत नसल्यामुळे ही योजना केवळ पांढरा हत्ती ठरत आहे.

उक्कडगावला पाणीच पाणी तरी पाणी मिळेना
पूर्व भागातील उक्कडगावसाठी मुख्यमंत्री पेयजल योजनेतून ५५ फूट खोल विहीर खोदण्यात आली. परंतु टेंडर रखडून उशिरा निघाले. त्यानंतर विहीर खोदली तिला पाणीच-पाणी असूनही केवळ पाईपलाईन होण्यासाठी आणखी एक महिन्याचा अवधी लागणार आहे. त्यामुळे गावाला पाणीपुरवठा करणे अवघड झाले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीला टँकर मागणीच प्रस्ताव भूजल यंत्रणेकडे द्यावा लागला.

प्रतिक्रिया 
महाराष्ट्र जीवन प्रधिकरणकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे थकित विजबील बाकी आहे. त्यामुळे यावर्षी तळ्यात पाणी येता येता राहिले. गावाला पाणी समस्या भेडसावत असल्यामुळे आजपासून पाण्याचे टँकर सुरु केले आहेत.
संदीप रणधीर, सरपंच.