Breaking News

दखल - भाजपची चाणक्यनीती - पाय बांधा, बोगस कार्ड वापरा ; पण मतदान करा

भारतात लोकशाही राज्यपद्धती आहे. इथं लोकांना मतदान करण्याचं जसं स्वातंत्र्य आहे, तसं मतदान न करण्याचंही आहे. मतपत्रिकेवरील कोणताही उमेदवार पसंत नाही, म्हणून कोणालाही मतदान न करता नोटाला मतदान करण्याचाही पर्याय आहे. पाच वर्षे मतदारांची साधी आठवण ही न येणार्‍यांना निवडणुकीच्या काळात अचानक मतदार राजा असल्याचा भास होतो. मतदारांची आळवणी केली जाते. मतदारांच्या पाया पडण्यात उमेदवार धन्यता मानतात. आता मात्र भाजपनं नवीच चाणक्यनीती आखायचं ठरविलं आहे. सरकारनं तसंच वेगवेगळ्या पक्षांनी वारंवार मतदारांना आवाहन करायचं, वेगवेगळी आमिषं दाखवायची, तरी मतदारराजा घरातून बाहेर पडायला तयार नाही.


मतदान कुणाला करायचं, याबाबत त्याचा संभ्रम होत असल्यानं कदाचित तो मतदानाला बाहेर पडत नसावा. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येदियुरप्पा यांनी हा प्रश्‍न कायमचा सोडवून टाकला आहे. जे मतदार मतदान करणार नाहीत, अशांचे हात-पाय बांधून त्यांना मतदान केंद्रांवर आणा आणि भाजपला मत देण्यासाठी भाग पाडा, असा सल्ला येदियुरप्पा यांनी दिला आहे. बेळगावमध्ये एका निवडणूक रॅलीमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना येडियुरप्पा म्हणाले, की आता आरामात बसू नका. जर तुम्हाला वाटले की कोणी मतदान करत नाही तर त्याच्या घरी जाऊन त्याचे हात-पाय बांधून त्याला मतदान केंद्रावर घेऊन या आणि भाजपचे उमेदवार महांतेश दोद्दागोडर यांना मत देण्यास भाग पाडा. महांतेश हे कर्नाटक ातील कित्तूर येथील उमेदवार आहेत. 12 मे रोजी कर्नाटकात मतदान होत आहे. देशात मतदान सक्तीचं करण्याबाबत निवडणूक आयोग विचार करीत होता. आता तसं करायची गरज नाही. निवडणुकीत प्रचारसभा, रॅलीवर खर्च करावा लागतो. तो ही करायची गरज नाही. कार्यकर्त्यांना मतदारांचे उंबरठे झिजविण्याची गरज नाही. मतदानाच्या दिवशी सरळ मतदारांच्या घरी जायचं. मतदारांचे पाय बांधायचे. त्याला उचलून गाडीत टाकायचं आणि त्याच्याकडून हव्या त्या उमेदवाराला मतदान करायला लावायचं. किती सोपी पद्धत आहे ही. खरं तर अशा सूचना करणार्‍या येदियुरप्पा यांचा देशपातळीवर सन्मान करायला हवा. भाजपच्या आतापर्यंतच्या यशाची ही गुरूकिल्ली तर नाही ना, अशी खवचट शंका कुणी तरी घेतली असली, तरी तिच्यावर विश्‍वास ठेवता कामा नये. येदियुरप्पा व भाजपला त्यासाठी धनदांडग्यांची फौज बाळगावी लागेल इतकंच. अर्थात ती तयारी त्यांनी अगोदर केली असावी. ठरावीक उमेदवारालाच मतदान करायचं असल्यानं मतपत्रिका तरी कशाला काढायची, ईव्हीएमची व्यवस्था तरी कशाला करायची?
येदियुरप्पा यांच्यापुढचा मार्ग भाजपच्या एका नगरसेविकेनं शोधून काढला असावा. कर्नाटकात हे घडतं आहे. इतरांवर भ्रष्टाचाराचा आरोप करणार्‍यांची वक्तव्यं आणि कृ ती कशी आहे, हे गेल्या दोन दिवसांत पाहायला मिळालं. बी. एस. येदियुरप्पा आणि भाजपमध्ये काही काळासाठी वाद झाला होता. भाजपनं येदियुरप्पांच्या मुलाला उमेदवारी न दिल्यानं ते नाराज झाले होते. मात्र, आता त्यांच्यात तडजोड झाली आहे. असं असलं, तरी येदियुरप्पा यांच्यासारख्या वाचाळ नेत्यामुळं आता भाजपचीच निवडणुकीचं मतदान दोन दिवसांवर आलं असताना कोंडी झाली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या दिवसांत बेंगळुरूत एका अपार्टमेंटमध्ये सुमारे 10 हजार मतदान ओळखपत्र आढळून आल्यानं राजकीय वातावरण तापलं आहे. बेंगळूरूतील राज राजेश्‍वरी नगरमधील जलाहल्ली भागात बुधवारी सकाळी ज्या फ्लॅटमध्ये बनावट निवडणूक ओळखपत्रं आढळून आली होती, तो फ्लॅट भाजपच्या माजी नगरसेविकेचा असल्याचं स्पष्ट झालं आहे. काँग्रेसनं या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी निवडणूक आयोगाकडं केल्यानं भाजापच्या अडचणी वाढल्या आहेत.
भाजप-काँग्रेसच्या एकमेकांवरील आरोपांनंतर आता या प्रकरणाला नवं वळण मिळालं असून या फ्लॅटची मालकीण मंजुळा नानजामरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मंजुळा यांनी सांगितलं, की 1997-2002 या काळात त्या भाजापच्या नगरसेविका राहिल्या आहेत. मात्र, काँग्रेससोबत आपला कुठलाही संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. भाजपनं या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केल्यानंतर लगेचच मंजुळा यांची प्रतिक्रिया आल्यानं भाजप आता चांगलाच अडचणीत आला आहे. भाजपनं हे पापही काँग्रेसच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला होता. मंजुळा नानजामरी या भाजपच्या बर्‍याच काळापासून नेत्या होत्या. मात्र, गेल्या 24 तासांतच भाजपचे कर्नाटकचे प्रभारी प्रकाश जावडेकर यांनी त्यांना निरुपयोगी ठरवलं, असा आरोप काँग्रेस नेते रणदीप सुर्जेवाला यांनी केला आहे. तसंच या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी निवडणूक आयोगाकडं केली आहे. 15 वर्षे मंजुळा नानजामरी या भाजपच्या नगरसेविका राहिल्या असल्याचं भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी मान्य केलं आहे. मात्र, त्यांचा आता भाजपशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. तसंच या प्रकरणाची चौकशी व्हावी असंही त्यांनी म्हटलं आहे. हा शहाजोगपणा आहे. बनावट ओळखपत्र तयार क रायची, त्याच्या आधारे कार्यकर्त्यांनीच मतदान घडवून आणायचं, ही अतिशय सोपी पद्धत आहे. मतदारांचे हातपाय बांधायचीही गरज राहिलेली नाही. त्यापेक्षा असं काहीच न क रता निवडणूक आयोगाला भाजपनं फक्त त्यांच्याच उमेदवारांची यादी द्यायची आणि निवडणूक आयोगानं निवडणूक न घेताच ते निवडून आले असं जाहीर करायचं. कशी वाटते ही आयडिया?