Breaking News

ग्रामपंचायत निवडणुकीत काळे गटाने बालेकिल्ला राखला


कोपरगाव :तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या ९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राजकीयदृष्ट्‍या प्रतिष्ठेच्या असलेल्या सुरेगाव, शहाजापूर व मंजूर ग्रामपंचायतीमध्ये काळे गटाच्या सरपंचपदाच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळविला. बालेकिल्ला राखण्यात काळे गट यशस्वी ठरला. 
मूर्शतपूर ग्रामपंचायतमध्ये सत्तांतर झाल्यामुळे कोल्हे गटाला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. या ग्रामपंचायतीची सत्ता काळे गटाने मिळविली आहे. काळे गटाचे निवडून आलेले सरपंचपदाच्या उमेदवारांमध्ये सुरेगावचे शशिकांत वाबळे, शहाजापूरचे सचिन वाबळे, मंजूर ग्रामपंचायतीच्या उषा जामदार आणि मूर्शतपूरच्या साधना दवंगे आदींचा समावेश आहे.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या चितळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विखे, काळे आघाडीने कोल्हे गटाचा धुव्वा उडविला. सरपंचपदाच्या उमेदवार दिपाली वाघ मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्या आहेत. काळे गटाचे नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचे माजी आ. अशोक काळे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांनी अभिनंदन केले आहे.