Breaking News

देवगड येथे भागवत कथेच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा


नेवासाफाटा - नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे पुरुषोत्तम मासानिमित्ताने सुरू असलेल्या श्रीमद भागवत कथेप्रसंगी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्मोत्सव राधे कृष्ण, राधे कृष्णच्या जयघोषाने उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.श्रीमद भागवत कथेतील मंगळवारी दि.22 रोजी भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्मोत्सव हा विषय होता. भागवतकार गुरुवर्य शंकरजी महाराज यांनी आपल्या सुश्राव्य वाणीतून भगवान परमात्म्याच्या जन्मोत्सवाचे वर्णन केले. 

जन्मोत्सवाप्रसंगी पुष्पांनी सजविलेल्या पाळण्यात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची मूर्ती ठेवण्यात आली. यावेळी गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या हस्ते वेदमंत्राच्या जयघोषात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी राधे कृष्ण राधे कृष्ण असा जयघोषात पुष्पवृष्टी करून जन्मोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी झालेल्या जन्मोत्सव सोहळ्याचे पौरोहित्य भेंडा येथील वेदशास्त्रसंपन्न मुख्य पुरोहित आचार्य गणेशदेवागुरू, हेमंत गुरू कुलकर्णी , पैठण येथील अशोकगुरू भुसारे, भूषण कुलकर्णी, स्वप्नील पिंपळकर, प्रशांत जोशी यांनी केले.यावेळी भागवत कथेचा चौथ्या दिवशी भागवतकार शंकरजी महाराज यांनी निरूपण केले तसेच भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या अवताराचे ही महत्व विषद केले. संगीतमय भागवत कथेप्रसंगी भाविक तल्लीन होऊन टाळ्यांच्या साथीने भक्तीसागरात न्हाऊन निघाले होते. 

यावेळी गुरुवर्य बाबांच्या मातोश्री प.पू.सरूबाई पाटील, बाळू महाराज कानडे, माजी जिल्हा परिषद सदस्या आशाताई मुरकुटे, अँड.सुखदेव वाखुरे, श्री दत्त लक्ष्मीनारायण यागमधील यजमान गंगापूर येथील राम कदम, दुर्गा कदम, कचरू भागवत, बंटी पठाडे, सरपंच अजय साबळे, उपसरपंच भीमाशंकर वरखडे, ज्ञानदेव लोखंडे, महेंद्र फलटणे, संदीप साबळे यांच्यासह भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.