Breaking News

उक्कलगावच्या ग्रामसभेत विविध नागरी प्रश्‍नावर झाली चर्चा


उक्कलगाव - महाराष्ट्रदिनी न झालेली ग्रामसभा मंगळवार ( दि. 22 ) रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान उक्कलगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरु झाली. ग्रामसभेला सदस्यसंख्या कमी होती. महिला सदस्यांऐवजी त्याने पतीराज सभेस उपस्थित होते. या सभेत विविध नागरी प्रश्‍नांवर सकारात्मक चर्चा झाली.

सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच नितीन थोरात हे होते. सभेची अध्यक्षीय सूचना सुनील थोरात यांनी मांडली. सभेच्या सुरवातीला मागील सभेचे ग्रामविकास अधिकारी रमेश निबे यांनी इतिवृत्त वाचन केले. निबे यांनी मंजूर झालेल्या कामांची माहिती ग्रामस्थांसमोर मांडली. त्यात घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांची माहिती देण्यात आली. तसेच जागेअभावी रखडलेल्या घरकुलांची माहिती दिली. नंदू थोरात यांनी उक्कलगाव मध्ये गावठाणची जागा शिल्लक किती आहे ? असा सवाल करत खाजगी मालमत्ताधारकांनी गावठाणावर अतिक्रमण केले आहे , त्यासंदर्भात ग्रामपंचायत व सरपंचानी भूमिलेख अभिलेख अधिकार्‍यांना बोलवून तातडीने मोजणी करावी अशी मागणी केली. बंदिस्त गटारींवर झाकणे नाही, केरकचरा साठतो, पाणी तुंबते, नागरिकांच्या दारात गटारीचे पाणी जाते त्यासंदर्भात सभेत चर्चा झाली. त्यावर दखल घेण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. जुनी 1 लाख, 20 हजार लिटर क्षमता असलेली पाण्याची जुनी टाकी मोडकळीस आली असल्याने नवीन पाण्याच्या टाकीचा प्रस्ताव करून जिल्हा परिषदेकडे पाठवावा अशी सूचना सुनील थोरात यांनी केली. डोलधारकांना डोल मिळण्यास अनेक अडचणी निर्माण झाल्याने जेष्ठ नागरिकांनी त्यांच्या व्यथा मांडल्या. 

मागील 26 जानेवारीच्या ग्रामसभेला नूतन सरपंचाच्या काळात लक्षणीय गर्दी झाली होती ; तशी यावेळी गर्दी नव्हती. मागील सभेत दारूबंदीचा ग्रामसभेत ठराव करून स्वतः सरपंच नितीन थोरात यांनी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांना निवेदन देऊन मागणी ही केली होती . परंतु आजपर्यंत उक्कलगावात, शाळेलगतच्या परिसरात खुलेआम गावठी दारू विक्री सुरु असल्याने सरपंच थोरात यांनी कडक भूमिकेत दारू बंद करावी असे सुनावले. संभाजी धनवटे यांनी दारूविक्री बंद केल्याने आम्हाला सहकार्य केल्याने त्यांचे आभार सुनील थोरात यांनी ग्रामस्थांसमोर मांडले. शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रताप पटारे यांची निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. शेवटी हरिहर केशव गोविंद यात्रा समितीच्या 
खर्चाचा हिशोब देण्यात आला. यावेळी सभेला सरपंच नितीन थोरात, तलाठी रुपेश कारभारी, ग्रामविकास अधिकारी रमेश निबे, आरोग्य सेविका शारदा लोखंडे, ज्ञानदेव थोरात, बाबासाहेब कर्डीले, बाळासाहेब थोरात, दिलीप थोरात, दत्ताञय पोटे, रावसाहेब तांबे, रावसाहेब थोरात, काशिनाथ थोरात, अनिल थोरात, शरद थोरात, रमेश धनवटे, निवृत्ती थोरात, शफिक पठाण, सागर चव्हाण आदी ग्रामस्थ उपस्थित होते.