दुष्काळाचा सामना करण्यासाठी 1,269 कोटींची मदत
नवी दिल्ली, दि. 29 - राज्यातील दुष्काळाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने 1 हजार 269 कोटी रूपयांची अतिरिक्त मदत देण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस कृषीमंत्री राधामोहन सिंह, गृह राज्यमंत्री किरेन रिजीजू, केंद्रीय गृह सचिव राजीव महर्षी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यापूर्वी राज्याने केंद्राकडे पुरवणी मागणीचा प्रस्ताव ठेवला होता.या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. राज्यातील गावांमध्ये असलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 10 हजार कोटी रूपयांची मागणी केली होती. दरम्यान राज्यातील दुष्काळी परिस्थिती असलेल्या गावांच्या संख्येत वाढ झाल्याने राज्य सरकारने पुरवणी प्रस्तावही सादर केला होता. याव्यतिरिक्त दुष्काळी परिस्थितीची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन परिस्थितीचा आढावा देखील दिला होता. मात्र केंद्र सरकारच्या अतिरिक्त मदतीमुळे काहीशा प्रमाणात शेतक-यांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.