Breaking News

संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीराला प्रतिसाद


निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन च्या नगर शाखेतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन नुकतेच मिस्कीनरोड जॉगिंग पार्क समोरील निरंकारी सत्संग भवन येथे केले होते. सदर शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला एकूण280 जणांनी यात मोफत आरोग्य तपासणी करुन घेतली तसेच त्यांना संबंधीत आजारासाठी मोफत औषधे, गोळ्या देण्यात आल्या शिबीराचे उद्घाटन डॉ.बापूसाहेब कांडेकर यांनी फीत कापून केले. उद्घाटन समारोहच्या अध्यक्षपदी डॉ.टी.के.नागदेव होते तसेच या प्रसंगी हुबळी येथील प्रसिद्ध कार्डीओलॉजिस्ट व डायबिटोलॉजिस्ट तज्ञ डॉ.पुरुषोत्तम अरोरा व त्यांचे सहकारी डाक्टर्स उपस्थित होते.

डॉ.कांडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि, संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनचे देशव्यापी विविध समाजोपयोगी उपक्रम खरोखरच स्तुत्य असून इतरांना अनुकरणीय आहेत. तसेच उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांच्यातील मानवसेवा हीच ईश्‍वर सेवा ही वृत्ती व उपक्रमांमधील सातत्य म्हणूनच त्यांचे कार्य प्रशंसनीय आहेत असे गौरवोद्गार शेवटी काढले.

डॉ.पुरुषोत्तम अरोरा म्हणाले कि, आम्ही ठिकठिकाणी आरोग्य तपासणी शिबीरे आयेाजित करुन लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत आहोत की वेळोवळी तपासणी करुन घ्या, डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधांचा कोर्स पूर्ण करा, पथ्य पाळा व संतुलीत, पोषक आहार घ्यावा, व नियमित व्यायाम करावा. आज वेळेअभावी लोक आपल्या शरीराकडे व आजारांकडे दुर्लक्ष करीत असून ही घातक सवय पुढे मोठ्या आजाराचे स्वरुप घेते म्हणून प्राथमिक अवस्थेतच आजाराचे निदान करुन घेऊन औषधोपचार घ्यावा शेवटी त्यांनी पाणी जास्त प्या, थोडं थोडं खा, आहारात मीठाचे प्रमाण कमी ठेवा, रात्रीचे कमी खाणे व पुरेशी झोप घ्या असा सल्ला उपस्थितांना दिला.

सदर आरोग्य तपासणी शिबीरात हृदयरोग, मधुमेह, दमा, अस्थिरोग, उच्च रक्तदाब, सांधे दुखी, स्त्रीरोग, बालरोग आदि आजाराच्या रुग्णांची तज्ञ डॉक्टर्सनी तपासणी केली तसेच बी.पी., एचबी, ईसीजी आदींची गरजू रुग्णांची तपासणी करुन त्यांना औषधे देण्यात आली. डॉ.मनिष थावानी व डॉ.महक शादिजा यांनी शिबीरात होमिओपॅथिक तज्ञ म्हणून सेवा दिली.

याप्रसंगी पाहुण्यांचा निरंकारी वाचन साहित्य भेट देऊन सत्कार करण्यात आला. किशोर खुबचंदानी यांनी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या आरोग्य, शैक्षणिक आदि क्षेत्रातील उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. सुत्रसंचालन शिवाजी भोसले यांनी केले व जयराम खुबचंदानी यांनी आभार मानले.