Breaking News

शिक्षक बदल्यांना ग्रामस्थांचा विरोध


भेंडा प्रतिनिधी - आगामी शैक्षणिक वर्षांत होणाऱ्या शिक्षकांच्या बदल्यांना नेवासा तालुक्यातील नजीक चिंचोली ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. नजीक चिंचोली जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग आहेत. आ. बाळासाहेब मुरकुटे यांच्या प्रयत्नाने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या शाळेला नववी आणि दहावीचे वर्गमंजुरीची तयारी दर्शविलेली आहे. तसा प्रस्तावही दाखल करण्यात आलेला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की नजीक चिंचोली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही खेडेगावातील नावारूपास आलेली एक आगळीवेगळी शाळा आहे. या शाळेचा शैक्षणिक विकास होण्यात ग्रामस्थांसह सध्या येथे कार्यरत असलेल्या शिक्षकांचा मोठा वाटा आहे. स्वतःचे पैसे खर्च करून त्यांनी या शाळेचा कायापालट केला आहे. ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धतीचा अवलंब करत असलेल्या या शाळेला आयएसओ प्रमाणपत्र, बिमा स्कुल पुरस्कार ही मिळालेले आहेत.

सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या बदल्या झाल्यास शाळेच्या गुणवत्तेवर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ऑनलाईन बदल्या होणार असल्या तरीही या शिक्षकांना ग्रामस्थ सोडणार नाहीत आणि नवीन शिक्षकांनाही हजर करून घेणार नाहीत, असा पवित्रा येथील ग्रामस्थांनी घेतला आहे. नजीक चिंचोली शाळेतील शिक्षकांना इतर शिक्षकांनी खोली देऊ नये, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. तरीही बदल्या करण्याचा प्रयत्न झालाच तर शाळा बंद राहिली तरी चालेल. परंतु नवीन शिक्षकांना हजर करून घेतले जाणार नाही. शाळेचे आणि या शाळेत शिक्षण घेणाऱ्या आमच्या मुलांचे भवितव्य ठरविण्याचा पूर्ण अधिकार ग्रामशिक्षण समिती व शालेय व्यवस्थापन समितीला आहे, असे सरपंच अनिता पाठक, शिवाजी चावरे, शिवाजीराव पाठक, अर्जुन धाडगे, विधिज्ञ बन्सी सातपुते, कैलास धाडगे, बाबासाहेब धाडगे, ज्ञानेश्वर गाडे, बाळासाहेब ढागळे, भागचंद पाठक, रसूल सय्यद, किशोर गायकवाड, राजेंद्र आढागळे, सोन्याबापू आढागळे आदींनी ठणकावून सांगितले आहे.