Breaking News

भारतात उद्योग वाढीला पोषक वातावरण - सुभाष देसाई


मुंबई, दि. 17 : भारतात उद्योग वाढीला पोषक वातावरण असून इतर देशातील उद्योजकांना राज्यात उद्योग उभारणीसाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज सांगितले. चीन, बेलारस आणि जर्मन या देशातील शिष्टमंडळाने आज उद्योगमंत्री श्री. देसाई यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते. उद्योग वाढीसह मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या माध्यमातून झालेली गुंतवणूक आणि राज्यात उद्योग विस्तार करण्याच्या मुद्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

बेलारसचे राजदूत व्हिटॅली प्रिमा, व्यवसाय सल्लागार अॅन्डेरी मिसयुरा यांनी उद्योगमंत्र्यांची भेट घेतली. या शिष्टमंडळाने महाराष्ट्रात आपला व्यवसाय वाढविण्यासाठी विशेष क्लस्टर स्थापन करण्याची मागणी उद्योगमंत्र्यांकडे केली. उद्योग वाढीसाठी भारतातील अनेक कंपन्यांसोबत करार करण्याची तयारी यावेळी दर्शविण्यात आली. बेलारसच्या कंपनीने शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल असे आधुनिक तंत्रज्ञानयुक्त ट्रॅक्टर विकसित करण्याची मागणी यावेळी उद्योगमंत्री श्री. देसाई यांनी केली. त्यास बेलारसच्या शिष्टमंडळाने सकारात्मक प्रतिसाद दिला.
बेलारस येथील काही कंपन्या किर्लोस्कर कंपनीसोबत ट्रॅक्टर, डंपर तसेच अवजड ट्रक बनवत आहेत. यापुढे खाणकाम उद्योगातही कंपनी उतरणार असून त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची विनंती यावेळी करण्यात आली. या निमित्ताने दोन्ही देशातील आर्थिक तसेच राजनैतिक संबंध अधिक दृढ करण्यावर यावेळी चर्चा करण्यात आली.