Breaking News

पर्यावरण सेवा योजना प्रभावीपणे राबविण्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचे निर्देश


मुंबई, दि. 17 : पर्यावरण सेवा योजना अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज येथे दिले. मंत्रालयात आयोजित राज्य पर्यावरण सेवा योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पर्यावरण विभागाचे अपर मुख्य सचिव सतीश गवई उपस्थित होते.

श्री. कदम म्हणाले, पर्यावरण हा विषय केवळ वर्गात न शिकविता प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून शिकविला पाहिजे. माती, पाणी, जैवविविधता, ऊर्जा, घनकचरा व्यवस्थापन, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, स्वच्छ नद्या, स्वच्छ तलाव,प्लास्टिक आणि थर्माकोल बंदी असे विषय शिकविल्याने भविष्यात मुलांमध्ये पर्यावरणविषयक जागृती वाढीस लागेल.

पर्यावरण विषयक माहिती, मुलांबरोबरच नागरिकांना समजणे आवश्यक असून त्यांचेही प्रबोधन करणे आवश्यक आहे. प्लास्टिकचा वापर कसा घातक आहे याचा जनतेमध्ये प्रचार आणि प्रसार करावा. कापडी पिशव्या वापरण्याचा संदेश घराघरात पोहोचवला पाहिजे. या कामी स्थानिक लोकांना सहभागी करुन घ्यावे.

पर्यावरण सेवा ही योजना राज्यातील 6 प्रशासकीय विभागातील आणि प्रदूषित 12 जिल्ह्यांमध्ये राबविली जाते. यामध्ये नागपूर, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, जालना, पुणे, सोलापूर, ठाणे आणि रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश आहे.

पर्यावरणाशी निगडीत समस्या समजून घेतल्यावर उपाययोजना करणे, निसर्ग व मानव यांच्यातील नातेसंबंध समजून घेऊन पर्यावरण संवर्धनासाठी नेतृत्वगुण विकसित करणे हा या पर्यावरण सेवा योजनेचा उद्देश आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी ही योजना आहे