Breaking News

येडियुरप्पा आज घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ राज्यपालांचे सत्ता स्थापनेसाठी भाजपला निमत्रंण

सत्तास्थापनेसाठी भाजप-काँग्रेस-जेडीएस यांचे दावे-प्रतिदावे ; घोडेबाजार तेजीत 
बंगळुरु/वृत्तसंस्था : कर्नाटकच्या जनतेने विधानसभा निवडणुकीत त्रिशंकू कौल दिल्यानंतर आता सरकार कुणाचे बनणार आणि मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता संपूर्ण देशात होती, मात्र बुधवारी नाटयमय वळणानंतर राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी भाजपला निमंत्रण दिले असून, दहा मंत्र्यांसह येडियुरप्पा आज गुरूवारी सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी राज भवन, ग्लास हाऊस येथे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. भाजपच्या सर्व आमदारांना व महत्वपूर्ण नेत्यांना बंगळुरूत दाखल होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शपथविधीची तयारी भाजपच्या गोटात सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस व जेडीएसतर्फे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. 

दरम्यान, कर्नाटकातही घोडेबाजार सुरु झाल्याचे दिसून येत आहे. भाजप, काँग्रेस आणि जेडीएसने याचे संकेत दिले आहेत. सत्तास्थापनेसाठी हे पक्ष कोणताही निर्णय घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या निवडणुकीत भाजप 104 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला असला तरी भाजपला बहुमत मिळवण्यात अपयश आले आहे. काँग्रेस 78 तर धर्मनिरपेक्ष जनता दल यांनी 38 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसने कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा दिला आहे. यामुळे कुमारस्वामी यांनी 117 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करत राज्यपालांकडे सरकार बनविण्याचा प्रस्ताव दिला आहे. तर दुसरीकडे भाजपकडून येडियुरप्पा यांनी सरकार स्थापनेसाठी दावा सादर केला आहे. यामुळे सरकार बनवण्यासाठी आवश्यक 112 आमदारांचा जादुई आकडा कोण बनवणार आणि मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या त्रिशंकु परिस्थितीमुळे कर्नाटकात घोडेबाजार सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. काँग्रेसचे सात आणि जेडीएसचे चार आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारण्यास संबंधित काँग्रेस आमदार तयार नसल्याची माहिती आहे. हे सातही आमदार लिंगायत समाजातील असल्याची मा हिती मिळाली आहे. बंडखोरी टाळण्यासाठी काँग्रेस आमदारांना कर्नाटकबाहेर धाडणार आहे. आपल्याक डे 118 आमदारांचे संख्याबळ असल्याचा दावा काँग्रेसने केला. दोन अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने जेडीएससोबत सत्तास्थापन करण्याचा विश्‍वास काँग्रेसतर्फे व्यक्त करण्यात आला.