Breaking News

राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचा-यांचे कामबंद अधिक तीव्र


सातारा, दि. 16, मे - राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यरत सर्व कर्मचा-यांनी दि. 11.4.2018 पासून, नियमित शासन सेवेमध्ये समायोजनाकरीता कामबंद आंदोलन सुरु केले होते.या आंदोलनाचे फलित म्हणून आरोग्य मंत्री महोदयांनी 21 एप्रिल रोजी संघटनेसोबत सभा घेवून पुढील 10 दिवसामध्ये त्रिसदस्यीय समिती स्थापनेबाबत शासन निर्णय काढणे, समितीमध्ये संघटनेच्या अध्यक्ष व सचिव यांचा निमंत्रीत सदस्य म्हणून सहभाग करुन घेणे, समितीची प्रथम सभा घेवून त्या सभेमध्ये एनएचएम अंतर्गत कार्यरत कर्मचारी यांचे समायोजनाच्या दृष्टीने आरोग्य व ग्रामीण विकास विभागाची पुढील पद भरती थांबविणे तसेच समिती स्थापनेपासून 3 महिन्याच्या कालावधीत एनएचएम अंतर्गत सर्व कर्मचारी यांचे आस्थापनेत बदल करुन समायोजन करण्यात येईल अशा प्रकारच्या मागण्या मान्य केल्या होत्या.

आरोग्य मंत्री महोदयांनी दिलेल्या वरील आश्‍वासनावर विश्‍वास ठेवून राज्य संघटनेने दिनांक 21.04.2018 पासून आंदोलन तात्पुरते 10 दिवसांकरीता स्थगित केलेले होते. यादरम्यान मंत्री महोदयांची त्रिस्तरीय स्थापन करणेबाबतचा शासन निर्णय व महिला कर्मचा-यांना 6 महिन्याची पगारी प्रसुती रजा या दोन मागण्या वगळता इतर कोणत्याही प्रकारची कार्यवाही के लेली नाही, यामुळे राज्य संघटनेने पुन्हा 8 मे रोजी पासून आंदोलन सुरु केले आहे.

आंदोलनाची अधिकची तीव्रता व कमी कर्मचा-यांमुळे आरोग्य सेवेवर होत असलेला परिणाम यामुळे प्रशासन हतबल झाल्याचे दिसून आले, याचमुळे 10 मे रोजी मा. आयुक्त, आरोग्य सेवा यांचे क ार्यालयातून संपात सहभागी असणारे कर्मचारी 48 तासाच्या आत कामावर रुजू न झालेस त्यांच्या सेवा समाप्त करुन नविन पदभरती तात्काळ सुरु करावी असे आदेश सर्व जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलेले आहेत. परंतु शासनाच्या अशाप्रकारच्या अन्यायकारक पत्राना न जुमानता संपातील कर्मचार्यांनी आंदोलन अधिकच तीव्र केले आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सातारा जिल्हयातील कार्यरत सर्व कर्मचारी जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारती समोर ठिय्या मांडून बसलेले आहेत, आंदोलनस्थळी खा.श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भेट देवून कर्मचा-यांच्या अडचणी जाणून घेतल्या व 17 मे रोजी पुणे येथे अर्थमंत्री सुनिल मुनगंटीवार यांचे भेटी दरम्यान कर्मचा-यांच्या समस्या मांडून त्याचे निराकारण करण्याचे आश्‍वासन दिले. तसेच उपस्थित कर्मचा-यांनी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांची भेट देवून त्यांना मागण्याचे निवेदन सादर केले, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, शाखा सातारा चे अध्यक्ष काका पाटील व सन्मानीय पदाधिकारी यांचीही भेट आंदोलकांनी घेतली व त्यांना निवेदन देवून या संपास सर्वोतोपरी सहकार्य करण्याबाबत विनंती केली, या विनंतीस मान देवून काका पाटील यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संपास महासंघाचा पूर्ण पांठिबा असल्याचा व आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले.