अकोलयाच्या शेतकर्यांचा पाथर्डीला अभ्यास दौरा
अकोला जिल्ह्याचे उपविभागीय कृषी अधिकारी यांचे मार्फत शेतकर्यांचा एकात्मिक फलोत्पादन अभियानांतर्गत 50 शेतकर्यांचा अभ्यास दौरा नगर जिल्हयामध्ये आयोजीत करण्यात आला आहे. त्यामध्ये पाथर्डी तालुक्यातील कौडगाव येथे कमी पाण्यात कशी शेती करावी, शेतीला जोडधंदा कोणता करावा? त्याचे व्यवस्थापन कसे करावे? कृषी विभागाच्या योजनांचा शेतकर्यांना कसा फायदा झाला? यासाठी प्रत्यक्ष शेतकर्यांशी सुसंवाद साधण्यासाठी दौरा आयोजीत करण्यात आला. या दौर्यात प्रभाकर आठरे यांचे पशुपालन 40 म्हशीचा गोठा, मुरघास युनिट, गाव्हाच्या काडाचे पशुखाद्य, दुध शितकरण 1.5 कोटी लिटरचे शेततळे, सघन पेरू लागवड, संत्रा डाळींब पिकाची पाहणी केली. संतोष आठरे यांचे पॉलिहाउस जरबेरा, गुलाब पिकांची पाहणी, मुक्त संचार गाईचा गोठा, खवा उत्पादन, विजय आठरे यांचे उत्कृष्ट डाळींब फळधारणा, आणासाहेब होडे यांचे बंदिस्त शेळीपालन आदी प्रकल्पाला भेटी दिल्या. प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर अकोल्याच्या शेतकर्यांनी दुष्काळावर मात करणार्या पाथर्डी तालुक्यातील शेतकर्यांचे कौतुक करून असे प्रयोग त्यांच्या शेतातही राबविण्याचा संकल्प केला. या अभ्यास दोर्यात अकोल्याचे कृषी सहाय्यक एस.एम काकडे यांचेसह पन्नास शेतकरी होते. या शेतकर्यांना प्रशांत गुंड, राहुल आठरे, संतोष भोईटे या कृषी अधिकार्यांनी मार्गदर्शन केले. करंजी कृषी मंडळामध्ये योजना राबविण्याची उत्कृष्ट कार्यपध्दती असल्यामुळे सातवड, घाटशिरस, कौडगाव येथे शेतकरी नेहमी भेटी देवुन शेतकर्यांचे व कृषी विभागाचे कौतुक केले जाते.