Breaking News

महसूल विभागातील बदली पात्र कर्मचार्‍यांची यादी तयार


सोलापूर, दि. 17, मे - शासन निकषानुसार 30 टक्के कर्मचारी बदली प्रक्रिया सुरू झाली आहे. शासनाने कर्मचार्‍यांचे समुपदेशन करून बदली प्रक्रिया राबवावी, असे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार लिपिक, अव्वल कारकून, तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या तालुकानिहाय याद्या प्रशासकीय विभागाने तयार केल्या आहेत. 
प्रशासकीय विभागाने बदलीस पात्र असलेल्या कर्मचार्‍यांची यादी तयार केली असून याचा अंतिम निर्णय जिल्हाधिकारी घेणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली. महसूल प्रशासनातील 90 लिपिक, 60 अव्वल कारकून, 28 मंडल अधिकारी व 150 तलाठी यांची बदली प्रक्रिया राबविली जात आहे. विनंती बदली ऐवजी समुपदेशनाद्वारे बदली करावी, अशा शासनाने सूचना दिल्या आहेत. त्यानुसार महसूल प्रशासनाने रिक्त पदांची यादी जाहीर केली आहे. समुपदेशनाद्वारे बदली करण्याच्या सूचनांमुळे कर्मचार्‍यांना बदली मागताना रिक्त जागा सोडून इतर ठिकाणी बदली मागता येणार नाही. आस्थपना विभागाने यंदा प्रथमच ज्या कर्मचार्‍यांची बदली होणार आहे, त्या जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवाय रिक्त जागा जाहीर करण्यात आली आहे. यामुळे बदली मागताना रिक्त जागा वगळता इतर ठिकाणी बदली मागता येणार नाही.