Breaking News

मार्केट यार्डातील अनधिकृत टपर्‍या हटविण्याचा निर्णय


पुणे, दि. 17, मे - मार्केट यार्डातील सर्व अनधिकृत टपर्‍या काढण्याचा निर्णय पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मागील काही दिवसात मार्केट यार्डात अनधिकृत टपर्‍यांची संख्या वाढली होती. श्री छत्रपती शिवाजी आडते असोसिएशनकडूनही टपर्‍या हटविण्यासाठी मागणी करण्यात येत होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. दरम्यान पणन, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी बाजार घटकांची बैठक घेतली. 

यामध्ये अनधिकृत टपर्‍या हटविण्याची मागणी थेट देशमुख यांच्याकडे करण्यात आली होती. त्यावेळी दस्तुरखुद्द देशमुख यांनी अनधिकृत टपर्‍या हटविण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतरही अनधिकृत टपर्‍या हटविण्यात आल्या नव्हत्या. मार्केटयार्डातील भाजीपाला, गूळ - भुसार, फूल विभागामध्ये बाजार समितीकडे नोंद असणार्‍या एकूण 140 टपर्‍या आहेत. मात्र, अनेक टपर्‍यांची नोंदच नाही. त्यानुसार पहिल्या टप्प्यात अनधिकृत टपर्‍या काढण्यात येणार आहेत. तर त्यानंतर ज्या टपर्‍यांना यापूर्वी परवानगी दिली आहे. मात्र, त्यातील तांत्रिक बाबी आणि बाजारातील गरज लक्षात घेवून टपर्‍या किती ठेवायच्या यावर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे यांनी दिली. ज्या व्यावसायिकांना बाजार समितीकडून टपर्‍या टाकण्यास परवानगी दिली आहे. मात्र, संबंधित टपरीधारकाने पोटभाडेकरु ठेवले आहेत, अशा 46 टपर्‍या आहेत. त्या देखील क ाढल्या जाणार आहेत.