Breaking News

हजारो निष्पाप साईभक्तांची सुरक्षा ‘राम भरोसे’


शिर्डी / किशोर पाटणी : येथील साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाने दर्शनरांगेचा मोठा गाजावाजा केला. शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर साईमंदिरालगतच्या ७ एकर जागेतील २ मोठ्या इमारती पाडल्या. मात्र ६ महिने उलटूनही दर्शनरांगेच्या कामाला सुरुवातदेखील झालेली नाही. त्यामुळे दरम्यान, भक्तांच्या निवासासाठी साईसंस्थाने मोठ्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत. परंतू केवळ मार्गदर्शनाअभावी रात्री उशिरा येणा-या परराज्यातील व अविकासित भागातील साईभक्तांना उघड्यावरच विश्रांती घ्यावी लागत आहेत. तब्बल एक हजार साईभक्त साईंच्या शिर्डीत उघड्यावर झोपत आहेत. 
महिला साईभक्तांची छेडछाड, यातून त्यांना होणार मानसिक त्रास, मोबाईल आणि त्यांच्या कष्टाच्या पैशांची चोरी या सारखा अप्रिय घटनांना या भक्तांना सामोरे जावे लागत आहे. साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, उपाध्यक्ष, माजी आ. चंद्रशेखर कदम आणि विश्वस्त मंडळ हे केवळ घोषणा करणारेच विश्वस्त मंडळ ठरले आहे.  दर्शनरांगेचा मोठा गाजावाजा झाला काम मात्र सुरु झाले नाही. परराज्यातील गरीब साईभक्त जे कुटूंबासह पहिल्यांदा शिर्डीत येतात. मात्र येथे राहण्याची आणि भोजनाची सुविधा आहे, हे या भक्तांना माहितच नसते. साईंच्या दर्शनाची आस, जवळच असलेले साईमंदिर आणि याच मोकळ्या जागेलगत स्नानगृह, शौचालय आहे. मात्र सुविधा असतांनाही केवळ भक्तांना मार्गदर्शन आणि मध्यरात्रीच्या वेळी सोडण्यासाठी बसेस नसल्याने हे हजारो साईभक्त रात्रीच्या वेळी उघड्यावरच झोपत आहेत. यात गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही तरुण झोपेचे सोंग घेऊन याठिकाणी चोरीच्या उद्देशाने झोपलेले असतात. साईभक्त आणि गुन्हेगार यातील फरक लक्षात येत नसल्याने याचाच गैरफायदा घेत चोरीसह महिला व मुलींच्या ची छेडछाडीच्या घटना या भागात अधूनमधून घडत असतात.

मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार 
साईशताब्दी ववर्षात दर्शनरागेंसाठी मोठ्या इमारती पाडण्यात आल्या. घोषणा करतांना वचनपूर्ती होत नाही. हजारो भक्तांना राहाण्याची सुविधा उपलब्ध असतांना साई संस्थानचे प्रशासन भक्तांना मार्गदर्शन करत नाही. गरीब साईभक्त मोकळ्या जागेत कुटूंबासह झोपतात. हे साईबाबा संस्थानचे अपयश आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना भेटून विविध समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधणारी आहोत.
राजेंद्र गोंदकर, 
भा. ज. पा. जिल्हा उपाध्यक्ष, शिर्डी

दोष नशिबाचा, भक्तांचा साईसंस्थांचा?

३ हजार कोटीची संपत्ती, शेकडो किलो सोने, मोफत भोजन, मोफत निवास व्यवस्था, ५ हजार कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ. मात्र मार्गदर्शन व सेवाचा अभाव. यामुळे उघड्यावर झोपणारे साईभक्त बघितल्याने दोष नेमका नशिबाचा की साईभक्तांचा की साईसंस्थानचा, हाच प्रश्न ग्रामस्थांसह साईभक्तांना भेडसावत आहे. 
सतिश गंगवाल, साईभक्त, शिर्डी.